नवी दिल्ली (विशेष राजकीय प्रतिनिधी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्लीत नीती आयोगाची सातवी बैठक पार पडली. शिवसेनेचे बंडखोर नेते तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित होते. पण या बैठकीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना योग्य स्थान दिले गेले नसल्याचे सांगत, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आमदार रोहित पवार यांनी दिल्लीत आज झालेल्या नीती आयोगाच्या बैठकीचा एक फोटो ट्विट केला. यामध्ये या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शेवटच्या रांगेत स्थान दिल्याबद्दल रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. देशाच्या अर्थव्यवस्थेचे इंजिन असलेल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना असे शेवटच्या रांगेत स्थान देणे चुकीचे आहे. त्यामुळे मराठी मनाला दु:ख झाले असून, यापुढे केंद्र सरकार दक्षता घेईल, अशी अपेक्षा करूयात असे रोहित पवार म्हणालेत. तर केंद्रात मुख्यमंत्र्यांना दिलेल्या वागणुकीवर अनेकांकडून केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त केली जात आहे. आजच्या नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांकडे १८ हजार कोटींच्या विकास कामाचे प्रस्ताव पाठवले आहेत. या बैठकी दरम्यान मुख्यमंत्री सर्वांत शेवटच्या रांगेत उभे असल्याचं फोटोत दिसत आहे.
सत्तेत नसल्याने राष्ट्रवादीचे दुखणं बाहेर येतंय – भाजपचे उत्तर
रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर भाजपने उत्तर दिले आहे. राष्ट्रपती संबोधित करत असताना एकनाथ शिंदे पहिल्या रांगेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याजवळ होते. त्यावर रोहित पवार काही बोलले नाही, पण शेवटच्या रांगेवरुन टीका केली जात आहे, हे योग्य नाही असे भाजप नेते आ. राम कदम यांनी म्हटले आहे. सत्तेत नसल्याचे दु:ख बाहेर येत असल्याचा टोलाही राम कदम यांनी लगावला आहे.