– मंत्रिमंडळ विस्तारासाठी दबाव वाढला
नवी दिल्ली (विशेष राजकीय प्रतिनिधी) – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे आज दिल्लीत दाखल झालेले आहेत. पंतप्रधानांनी बोलावलेल्या नीती आयोगाच्या बैठकीस ते हजेरी लावत आहेत. त्यानंतर, राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा करण्यासाठी ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. महिना झाला तरी, राज्यात मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळे शिंदे यांच्यावरील दबाव वाढला असून, याबाबत ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. त्यानंतर त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी भेटीची वेळ मागितली असल्याचे सूत्रांनी सांगितले. शिंदे-फडणवीस यांचे सरकार स्थापन होऊन ३५ दिवस झाले आहेत. परंतु, अद्याप राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे शिंदे यांच्यावरील अंतर्गत व बाह्य असा राजकीय दबाव प्रचंड वाढलेला आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी शिंदे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळातील संभाव्य नावांची यादी या नेत्यांकडे गेलेली आहे. त्यासंदर्भातही शिंदे हे चर्चा करण्याची शक्यता आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील दिल्लीतच तळ ठोकून आहे. त्यामुळे आज शिंदे-फडणवीस हे भाजप नेत्यांच्या भेटीसाठी जाणार असल्याचेही सूत्राने सांगितले.
—————
Leave a Reply