नंदूरबार (जिल्हा प्रतिनिधी) – जिल्ह्यातील दुर्गम भागात असलेली एस. ए. मिशन प्राथमिक शाळा मुंदलवड (ता.अक्राणी) येथे ‘हर घर तिरंगा’ रॅली काढण्यात आली. या रॅलीत मुख्याध्यापक रविकांत एस. वळवी शिक्षक, विद्यार्थी व ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नंदुरबार जिल्ह्यात ९ ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत ‘स्वराज्य महोत्सव’, तर १३ ते १६ ऑगस्ट २०२२ या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने आपले घर, इमारतीवर तिरंगा ध्वज फडकवावा. सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, विद्यापीठ, महाविद्यालय, शाळा, सर्व दुकाने, आस्थापनांनी या उपक्रम स्वयंस्फूर्तीने सहभागी होवून हा उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मनिषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.
आजादी का अमृत महोत्सवनिमित्त १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा उपक्रम राबवण्यात येणार असल्याने अतिदुर्गम भागातील लोक प्रतिनिधी, शिक्षक व जागरूक नागरिक यांनी ही या उपक्रमाला यशस्वी बनवण्यासाठी दुर्गम व अतिदुर्गम भागात पायपीट करत रॅलीद्वारे प्रचार व प्रसार करतांना दिसून येत आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्ताने नागरिकांच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृति तेवत राहाव्यात, या लढ्यातील क्रांतिकारक तसेच अज्ञात नायकांच्या घडलेल्या विविध घटनांचे स्मरण व्हावे. तसेच प्रखर देशभक्तीची भावना कायमस्वरूपी जनमानसात रहावी, या उद्देशाने आपल्या वैभवशाली इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव अंतर्गत १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ अभियान राबविण्यात येणार आहे. यामहोत्सवांतर्गत सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये, विद्यापीठ, महाविद्यालये, वसतिगृह, निवासस्थान, दुकाने, आस्थापनांवर या कालावधीत राष्ट्रध्वज तिरंगा ध्वज फडकवावा. प्रत्येक विभाग, उपविभाग, विद्यापीठ, महाविद्यालय, सर्व कार्यालयाच्या वेबसाईटवर,सर्व समाजमाध्यमावर दर्शनी भागावर ‘घरोघरी तिरंगा’ ही टॅगलाईन तसेच तिरंगाचे चित्र प्रदर्शित करावे. या संदर्भात जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची वेळोवळी आढावा घेऊन प्रशासनामार्फत सर्व तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती मनिषा खत्री यांनी दिली आहे.
जिल्ह्यात ३ लाख ८३ हजार राष्ट्रध्वज फडकविणार
नंदूरबार जिल्ह्यात ३ लाख ७५ हजार ९०० घरे असून शहरी भागात ४२ हजार ९९७ आणि ग्रामीण भागात ३ लाख ३२ हजार ९०३ घरांचा समावेश असून, एकूण ७ हजार ५८९ शासकीय, निमशासकीय कार्यालये, ग्रामपंचायत, शासकीय रुग्णालय, सहकारी संस्था असे मिळून जिल्ह्यात एकूण ३ लाख ८३ हजार ४८९ घरांवर राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार आहे. यासाठी ३ लाख ६० हजार १८७ झेंडे जिल्हास्तरावरुन उपलब्ध होणार असून, १९ हजार झेंडे हे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली. ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबवितांना भारतीय ध्वज संहितेनुसार राष्ट्रध्वजाचा मान राखला जाईल व त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही याची दक्षता घेण्यात येऊन उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी यावेळी केले आहे.
—————–