वन्यप्राण्यांकडून पिके फस्त; १४ ऑगस्टपर्यंत कायमचा बंदोबस्त करा; अन्यथा १५ ऑगस्टपासून उपोषण!
– माळपठार भागात वन्यप्राण्यांकडून उभ्या पिकांचे नुकसान
पुसद (तालुका प्रतिनिधी) – मोठ्या मुश्किलीने जगवलेली कोवळी पिके रोही, व रानडुकरे हे वन्यप्राणी फस्त करत असल्याने, शेतकरी मेटाकुटीस आला आहे. महसूल व वन विभागाने येत्या १४ ऑगस्टपर्यंत या वन्यप्राण्यांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करावा. अन्यथा, १५ ऑगस्टपासून वाशिम-पुसद रोडवरील हिवळणी (तलाव) फाटा येथे उपोषणाला बसणार आहोत, असा इशारा त्रस्त शेतकर्यांनी दिला आहे.
पुसद तालुक्यातील माळपठारावरील शेतकर्यांनी महागडे बी बियाणे, रासायनिक खते खरेदी करून कापूस, सोयाबीन, तूर, उडीद, मूग या खरीप पिकांची पेरणी केली. काही शेतकर्यांनी पेरणी केल्यानंतर जोरदार पाऊस झाला. पेरलेले उगवलेच नाही, म्हणून दुबार पेरणी करावी लागली. सध्या पंधरा दिवसानंतर आत्ता कसे तरी पीक तग धरत आहे, आणि शेतकर्यांनी डवरणी, निंदण, खुरपणी, कीटकनाशक फवारणी केल्याने थोडेफार पीक चांगले झाले आहेत. परंतु दिवसेंदिवस रोह्यांची व रानडुक्कराची संख्या झपाट्याने वाढत असून, शेकडोच्या घरात गेली आहे. हे प्राणी रात्रंदिवस ३० ते ४० च्या कळपाने पिकात मुक्तसंचार करत असून, पिके फस्त करून टाकत आहेत. त्याच्या हैदोसामुळे कोवळ्या पिकांचे अतोनात नुकसान होत असून, शेतकरी मेटाकुटीस आले आहेत.
पावसाची अनियमितता आणि असे बिकट संकटापुढे शेतकरी अगोदरच हतबल झाला आहे. त्यामुळे शेतीला लागलेला खर्चसुद्धा वसूल होत नाही. त्यावर वन्यप्राण्यांचे शेतीतील मुक्तसंचार नवीनच संकट उभे राहत आहे. वन्यप्राणांनी कहरच केला असल्याने शेतकरी त्रस्त आहेत. पिकाच्या संरक्षणाकरिता तार कुंपणाची आवश्यकता आहे. परंतु महागडे तार आणायचे कोठून, हा प्रश्न शेतकर्यांना पडलेला आहे. म्हणून प्रशासनातर्पेâ १४ ऑगस्टपर्यंत वन्यप्राणांचा बंदोबस्त न केल्यास, माळपठारावरील शेतकरी व शेतकरी प्रतिनिधी मोठ्या संख्येने १५ ऑगस्टपासून वाशिम-पुसद रोडवरील हिवळणी (तलाव) फाटा येथे उपोषणाला बसणार आहेत, असा इशारा शेतकर्यांनी दिला आहे. याबाबतच्या निवेदनावर, किशोर चव्हाण (सरपंच, पन्हाळा), श्रीकांत चव्हाण (संयोजक,मा.यु.मं), प्रा.नरेंद्र जाधव सर, कुबेरराव मस्के (उपाध्यक्ष, राष्ट्रवादी पुसद), संजय मदन आडे (अध्यक्ष, तांडा सुधार समिती पुसद), दुर्गादास महाराज (फेट्रा), सुनील चव्हाण (सरपंच, हिवळणी), सुभाष राठोड (फेट्रा), गजानन लोलुरे, दर्शन राठोड आदींच्या सह्या आहेत.