– पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून उद्धव ठाकरे राजीनामा देणार होते!
– सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानंतरच मंत्रिमंडळ विस्तार
– शिंदे गटाची आजची बैठक तडकाफडकी रद्द
मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सर्वोत्तम संबंध प्रस्थापित करण्याची तयारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची होती. त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन, भाजपसोबत येण्याची तयारीही केली होती. परंतु, भाजपने नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेतले आणि ठाकरे नाराज झाले. त्यातच, राणे पिता-पुत्रांनी आदित्य ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन आरोप केले, त्यामुळे शिवसेना-भाजपचे संबंध बिघडले, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते आ. दीपक केसरकर यांनी केला. राणेंना मंत्री केले नसते तर शिवसेना-भाजपची युती पुन्हा झाली असती, असेही त्यांनी स्पष्ट करून शिंदे गट व भाजपात राणेंवरून ऑल वेल नसल्याचे अपरोक्षरित्या स्पष्ट केले.
राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. शिवसेना नेत्यांकडून शिंदे गटावर सडकून टीका केली जात आहे. तर शिवसेनेचे महत्वाचे शिलेदार संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष मोठा संकटात सापडला आहे. त्यात राज्यात भाजप आणि शिंदे गट सत्तेवर आले आहेत. याचदरम्यान, शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषदेत मोठा गौप्यस्फोट केला. भाजपने ठरवून आमदार आदित्य ठाकरे यांची सुशांतसिंग प्रकरणात बदनामी केली, असा आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरांनी केला आहे. या बदनामीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा सहभाग होता. यामुळे मी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर ही वस्तूस्थिती घालून राणे काय बोलत आहे, हे सांगितले. त्यावेळी त्यांनीही प्रतिसाद दिला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात संवाद सुरू झाला. त्यानंतरच त्यांची भेट झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार होते. परंतु नंतर १२ आमदारांचे निलंबन झाले. त्यानंतर नारायण राणे यांना केंद्रात घेतले गेले. यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाराज झाले. सदर बाब केवळ दोन-तीन लोकांना माहिती होती. त्यात रश्मी ठाकरेही होत्या. तसेच उद्धव ठाकरेंनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना मोठी ऑफर दिल्याचेही केसरकरांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांना बाजूला ठेवा, आपण एकत्र येऊ, असे उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्याला सांगितले. पण भाजप तयार झाली नाही, असेही दीपक केसकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
मंत्रिमंडळाच्या विस्तारावर भाष्य करताना केसरकर म्हणाले, पक्षांतर्गत लोकशाही असावी की नाही हेही या निकालवरून समजेल. त्यासाठी विस्ताराला वेळ झाला तरी चालेल. पण सर्वोच्च न्यायालयाचा आदर राखणे गरजेचे आहे आणि तो आमच्याकडून राखला जात आहे. त्यामुळे विस्तार केला नाही. सोमवारी अंतरिम आदेश येईल व त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. कोर्टाचा मान ठेवावा, असे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांना वाटते. आता केसरकरांच्या गौप्यस्फोटानंतर शिवसेना आणि भाजपकडून काय प्रतिक्रिया येतात, याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे.
राज्यात सत्तास्थापन होऊन महिना उलटला आहे. मात्र तरीही मंत्रिमंडळ विस्ताराला अजूनही मुहूर्त सापडत नाही. या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर राज्यात एकनाथ शिंदे गटाची खलबते चालू आहेत. शिंदे गटाची आज (५ ऑगस्ट) बैठक पार पडणार होती. मात्र ही बैठक अचानक रद्द करण्यात आली. शिंदे गटातील आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामांबाबत या बैठकीत चर्चा होणार होती. या बैठकीचे ठिकाण ठरलेले नव्हते. मात्र ही बैठक अतिशय महत्त्वाची समजली जात होती. मात्र अनेक आमदार हे आपआपल्या मतदारसंघात असल्या कारणाने ही बैठक रद्द करण्यात आली आहे. दरम्यान याआधी शिवसेनेचीही मातोश्रीवरही बैठक पार पडणार होती. मात्र ही बैठकही अशाच प्रकारे रद्द करण्यात आली. मंत्रिमंडळ विस्ताराची संभाव्य यादी समोर आली आहे. भाजपकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, प्रवीण दरेकर, नितेश राणे, बबनराव लोणीकर यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर शिंदे गटाकडून शंभूराजे देसाई, संजय शिरसाट, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत, दीपक केसरकर यांची नावे समोर आली आहेत.