Breaking newsBuldanaChikhaliVidharbha

ढगफुटीने दाणादाण! ‘खडकपूर्णा’तून पाणी साेडले!

– मिसाळवाडी धरणापाठोपाठ ‘खडकपूर्णा’ही भरले!!

– नुकसानीचे तातडीने पंचनामे करा : डॉ. विकास मिसाळ यांची तहसीलदारांकडे मागणी


मिसाळवाडीच्या पुलासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार : सरपंच बाळू पाटील
मिसाळवाडी गावाला नदीचा विळखा असून, ही नदी ओलांडून गावात जावे लागते. तेव्हा, मिसाळवाडी नदीवर तातडीने पूल बांधण्यात यावा, अशी मागणी गावाचे सरपंच बाळू पाटील यांनी केली आहे. याबाबत आपण लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहोत, असेही त्यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले. दरवर्षी या नदीला पूर येतो, आणि गावाचा संपर्क तुटतो. काल गावावर अक्षरशः ढगफुटी झाली होती. त्यामुळे मिसाळवाडी धरण भरले व सांडव्यावरून पाणी आले. परिणामी, नदी दुथडी भरून वाहात होती. देऊळगावघुबे येथे शिक्षणासाठी गेलेली मुले-मुली, शेतीकामासाठी गेलेले महिला व पुरुष ग्रामस्थ, आजारी रुग्ण यांना गावात येता आले नाही, की गावातील कुणाला बाहेर जाता आले नाही. दरवर्षी अशा प्रकारे पंधरा पंधरा दिवस गावाचा संपर्क तुटतो. तरी राज्य सरकारने तातडीने गावाच्या या नदीवर उंच व दीर्घ पूल बांधून द्यावा, अशी मागणी सरपंच बाळू पाटील यांनी केली आहे. याबाबत आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेटणार आहोत, असेही ते म्हणाले.


चिखली (एकनाथ माळेकर) –  तालुक्यातील मिसाळवाडी हा लघुप्रकल्प पूर्णक्षमतेने भरल्यानंतर आता खडकपूर्णा हा मोठा प्रकल्पही पूर्णक्षमतेने भरत आला आहे. धरणाच्या पाणलोटात सुरु असलेला जोरदार पाऊस व मोठ्या प्रमाणात होत असलेली पाण्याची आवक पाहाता, खडकपूर्णा धरणाचे तीन वक्री दरवाजे उघडण्यात येऊन नदीत पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा खडकपूर्णा प्रकल्पाच्या पूरनियंत्रण कक्षाने दिला आहे. काल मेरा खुर्द महसूल मंडळातील मिसाळवाडी, पिंपळवाडी, शेळगाव आटोळ परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने, नदी-नाल्यांना पूर आला होता. नदीकाठच्या गावांत व शेतात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतीपिकांची अतोनात हानी झाली असून, या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष डॉ. विकास मिसाळ यांनी चिखली तहसीलदारांकडे केली आहे. त्यानुसार, तलाठ्यांनी माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. तर, अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने हेक्टरी ७५ हजारांची आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी मिसाळवाडीचे सरपंच बाळू पाटील यांनी केली आहे.
मेरा खुर्द महसूल मंडळात काल (दि.४) ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे. त्यामुळे परिसरातील नदी-नाल्यांना पूर आले आहेत. त्यामुळे नदीकाठच्या शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष व शेळगाव आटोळचे सरपंच डॉ. विकास मिसाळ यांनी चिखली तहसीलदारांकडे केली आहे. शेती नुकसानीचा तातडीने सर्व्हे करण्यात यावा, संबंधित तलाठ्यांना घटनास्थळी पाठवून पंचनामे करण्यात यावेत, आणि लवकरात लवकर शासनाकडे अहवाल जावा, अशी मागणीही डॉ. मिसाळ यांनी केली आहे. या परिसरात पावसाने झालेले नुकसान व सद्य परिस्थिती याबाबत त्यांनी माजी पालकमंत्री तथा आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनादेखील अवगत करून दिले. तर, ज्या शेतकर्‍यांचे नुकसान झालेत, त्यांना तातडीने आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे. शेतीपिके, घरांची पडझड आणि नुकसान झालेल्या ग्रामस्थ, शेतकर्‍यांना शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी. शेतीपिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी ७५ हजारांची मदत मिळावी, अशी मागणी मिसाळवाडीचे सरपंच बाळू पाटील यांनी केली आहे.

कालरोजी झालेला ढगफुटीसारखा पाऊस मागील पंधरा वर्षात पण झालेला नाही. दुपारी तीन ते रात्री एक वाजेपर्यंत मिसाळवाडी गावाचा संपर्क तुटल्यामुळे गावातील विद्यार्थी तसेच शेतीकाम करणारे मजूर, असे सर्व एकूण शंभर ते दीडशेजण पुरामुळे मिसाळवाडी फाट्यावरच अडकून पडले होते. या सर्वांच्या जेवणाची, पिण्याच्या पाण्याची, औषधींची, इतकेच काय पण गायछाप तंबाखू अशा सर्व बाबींची पूर्तता शेळगाव आटोळ मित्र मंडळ यांनी केली होती. रात्रीच्या संकटात ही माणसे देवासारखी धावून आल्याने, त्यांचे मिसाळवाडी ग्रामस्थांच्यावतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो.

सुनील मिसाळ, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मिसाळवाडी


खडकपूर्णा धरण भरले, पाणी साेडले

देऊळगावमही येथील खडकपूर्णा प्रकल्प ८५ टक्के भरला असून, पाण्याची माेठी आवक पाहाता, लवकरच हा प्रकल्प पूर्णक्षमतेने भरणार आहे. या धरणाच्या पाणलाेटात काल ढगफुटीसदृश पाऊस झाला होता. आजही  जोरदार पाऊस सुरुच आहे. त्यामुळे हे धरण लवकरच पूर्णक्षमतेने भरणार असून, त्यामुळे आज दुपारी तीन वक्री दरवाजे उघडून पाणी साेडण्यात आले. परिणामी, नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे, असा इशारा खडकपूर्णाच्या पूरनियंत्रण कक्षाने दिला आहे. आज सकाळी या धरणाची पाणीपातळी ५२० मीटर इतकी होती. त्यात झपाट्याने वाढ सुरु होती.  दरम्यान, पाटबंधारे खात्याने नदीकाठच्या गावांना पत्र पाठवून पूरस्थितीची जाणिव करून दिली असून, सतर्क राहण्यास सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!