आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : आळंदीतील वडगाव रस्त्यावर गेल्या काही दिवसांत दोन दुर्दैवी अपघात होऊन दोन जणांचे बळी गेले. यामुळे आळंदीतून होणारी दिवसा अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली होती. या मागणीस यश आले असून त्यावर कार्यवाही दिघी आळंदी वाहतूक पोलीस शाखेने सुरु केल्याने वाहतूक पोलीस प्रशासनाचा सत्कार आळंदी ग्रामस्थांचे तर्फे करण्यात आला.
आळंदीत अवजड वाहतूक बंद करण्यासाठी आळंदी पोलीस स्टेशन आणि आळंदी नगरपरिषदेस निवेदन देऊन खेड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष रोहन कुऱ्हाडे यांनी लक्ष वेधले होते. यावेळी सहाय्यक वाहतूक पोलीस निरीक्षक शहाजी पवार यांचा सत्कार माजी नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, खेड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष रोहन कुऱ्हाडे यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी शिवस्मृती प्रतिष्ठानच्या वतीने तेजस कुऱ्हाडे, सौरभ गव्हाणे, अमित कुऱ्हाडे, चेतन कानडे, प्रशांत भोसले, संकेत पाटील,सुदर्शन शिंदे, ओम गंगोत्री,निखील बनसोडे आदी उपस्थित होते. यावेळी आळंदी दिघी वाहतूक पोलीस शाखेतील कार्यरत वाहतूक पोलिसांना गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
आळंदीत दिवसा अवजड वाहनांना बंदी करण्यात आली असून यासाठी सुरु असलेली प्रभावी कार्यवाही कायम स्वरूपी सुरु राहावी अशी मागणी आळंदी ग्रामस्थाची आहे. यासाठी पोलिसांनी कायम दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. आळंदीत ये – जा करताना अवजड वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करून दिवसा सकाळी सात ते रात्री दहा या वेळेत वाहने आळंदीतून येणार नाहीत याची दक्षता घेण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.