राजेंद्र काळे (दैनिक देशाेन्नती जिल्हा प्रतिनिधी)
बुलडाणा – वैनगंगा व्हाया नळगंगा ते पैनगंगा असा महत्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पाचा मुद्दा मंगळवार, २ ऑगस्टला संसदेच्या पटलावर उपस्थित होणार असून, यावर बुलडाणा लोकसभा मतदार संघाचे खा.प्रतापराव जाधव बोलणार आहेत. हा प्रकल्प विदर्भातील बुलडाण्यासह वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर व अमरावती या ६ जिल्ह्यांसाठी तर मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यासाठी महत्वपुर्ण ठरणार आहे. वैनगंगा ते नळगंगा, असा नदीजोड प्रकल्प पुर्वनियोजीत होता. त्यात तो पैनगंगापर्यंत आणण्याचे आश्वासन लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान खा.प्रतापराव जाधव यांनी दिले होते. त्या अनुषंगाने हा मुद्दा आता संसदेच्या पटलावर येणार आहे, असे खा.जाधव यांनी ‘देशोन्नती’शी बोलतांना सांगितले.
खा.जाधव यांनी विविध मुद्यांवर बोलतांना नदीजोड या महत्वपुर्ण प्रकल्पाची माहिती देतांना ते म्हणाले की, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी नदीजोड प्रकल्पासाठी आग्रही होते, त्यांनी यासंदर्भात जी नदीजोड समिती स्थापन केली होती त्यात शिवसेनेच्या तत्कालीन मंत्री सुरेशप्रभु अध्यक्ष होते. परंतु पुढे २००४ला सरकार बदलले व तो प्रकल्प पुढे जावू शकला नाही. आता मात्र पुन्हा एकदा ती संधी चालून आली आहे. विदर्भात सिंचनाचा प्रचंड अनुशेष आहे, त्यासाठी १९८५ला धांडेकर समिती गठीत करण्यात आली होती. मात्र काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने विदर्भातील सिंचनाचा अनुशेष भरुन काढण्याचा कुठलाही प्रयत्न केला नाही. मात्र नळगंगा ते वैनगंगा नदीजोड प्रकल्पाने वैनगंगेचे जे ११७ टीएमसी पाणी समुद्रात वाहून जाते ते व्हाया नळगंगा ते पैनगंगा नदीपर्यंत आणल्या जाईल. यातून शेतीच्या क्षेत्राचा फायदा होत असतांना रोजगारीची समस्याही आटोक्यात येवू शकते, असे खा.जाधव यांनी सांगून त्यासाठीच संसदेत दाखल होणारा हा मुद्दा महत्वाचे असल्याचे सांगितले.
पहिल्यांदा पायीवारी चुकतेय..
श्री संत गजानन महाराज पालखी ही नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी खामगाववरुन शेगावला जाते. २००९ पासून कोरोनाचे २ वर्ष सोडलेतर ही पायी वारी करतो. मात्र यावेळी संसदेत नदीजोड प्रकल्पावर बाजू मांडायची असल्याने ही पायीवारी पहिल्यांदा चुकत असल्याची खंत खा.जाधव यांनी व्यक्त केली.
भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी शिवसेना संपणार असल्याचे जे विधान केले, ते उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेसंदर्भात असल्याचे खा.जाधव ‘देशोन्नती’शी बोलतांना म्हणाले. गुडघ्याला बाशींग बांधून असलेलेच फक्त ठाकरेंच्या शिवसेनेत असल्याचा टोला खा.जाधव यांनी लगावून त्यांना अनेकठिकाणी उमेदवारही मिळणार नाही, असेही खा.प्रतापराव जाधव म्हणाले.