– श्रींच्या भक्तांकडून पालखीचे ठीकठिकाणी स्वागत
– नगर परिक्रमेत भाविकांनी घेतला श्रींच्या दर्शनाचा लाभ
खामगाव (ब्रेकिंग महाराष्ट्र) – आषाढी वारीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर येथे गेलेली श्री संत गजानन महाराजांची पालखी अश्व, गज व ‘गजानना अवलिया, अवतरले जग ताराया’ या जयघोषात खामगावनगरीत परतीच्या प्रवासात पोहोचली. या पालखी सोहळ्याचे श्रींच्या भक्तांकडून ठीकठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले. पालखीने नगरपरिक्रमा करताना भाविक-भक्तांची श्रींच्या दर्शनासाठी गर्दी उसळली होती. आज खामगाव नगरी भक्तिरसात न्हाहून निघाली.
हनुमान व्हिटॅमिन येथील पहिल्या मुक्कामानंतर सकाळी ११ वाजता महाराजांच्या पालखीच्या नगर परिक्रमेला सुरुवात झाली. शहरात ठिकठिकाणी पालखीचे स्वागत करण्यात आले, तसेच भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. खामगाव शहरातील वाल्मिक चौक, विकमसी चौक, कृषी उत्पन्न बाजार समिती, टिळक पुतळा, अर्जुन जलमंदिर, मुख्य रस्ता, जगदंबा चौक, महावीर चौक, मोहन चौक, फरशी, महावीर भवन, एचडीएफसी बँक, खामगाव अर्बन बँकेसमोरून नॅशनल हायस्कूलच्या प्रांगणात दुपारी ३ वाजतापासून पालखी मुक्कामी थांबेस. तर बुधवारी पहाटे अग्रसेन चौक, कमान गेट, शहर पोलीस स्टेशन, आयकर भवन, बस स्थानक चौकमार्गे सामान्य रुग्णालयासमोरून शेगावसाठी हा पालखी सोहळा मार्गस्थ होईल.
उद्या, बुधवारी पहाटे श्री संत गजानन महाराज यांची पालखी खामगाववरून शेगावकडे प्रस्थान होईल, यावेळी भाविक मोठ्या संख्येने शेगाव पायीवारी करणार आहेत. पालखीचे व भाविकांचे ठीकठिकाणी स्वागत होणार असून, त्यांच्यासाठी चहा, नास्ता, महाप्रसाद वितरणाची व्यवस्था विविध सेवाभावी संघटनांनी केली आहे. यामुळे उद्या, खामगाव – शेगाव हा राज्यमहामार्ग सर्वप्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांनी काढलेला आहे, अशी माहिती तहसीलदार समाधान सोनवणे यांनी दिली आहे.