नंदूरबार (आफताब खान) – जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड करण्यात आली असली तरी, जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे कापूस पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला असून शेतकरी अडचणीत सापडला आहे. परिणामी, यंदा कापूस उत्पादनाला जिल्ह्यात माेठा फटका बसणार आहे.
नंदुरबार जिल्ह्यात दीड लाख हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली आहे. त्यात पूर्व हंगामी कापूस आणि खरीप कापूस लागवड असे दोन प्रकार पडतात, पूर्व हंगामी कापूस लागवड केलेल्या शेतकऱ्यांना सध्या मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागत असून, कापसाच्या पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. कापसाच्या झाडाची पाने लाल पडत असून फुल फुगडी ही गळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना समस्या निर्माण झाल्या आहेत. तर झाडाची पाने लाल होऊन झाडे मरत असल्याने बुरशीजन्य रोगांचाही मोठा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
कापसाचे पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात महागड्या रासायनिक कीटकनाशकांचा वापर केला जात असून, कापूसपीक वाचवण्यासाठी शेतकरी संघर्ष करत आहेत. कृषी विभागाने जिल्ह्यातील कापूस पिकांच्या रोगांचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना योग्य त्या सूचना आणि मार्गदर्शन करावे आणि नुकसान झालेल्या कापूस पिकाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात यावर्षी कापसाचे क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने यापूर्वी वर्तवला होता. त्यानुसार, जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 10 हजार 760 हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड पूर्ण झाली आहे. अजूनही कापसाची लागवड सुरू असल्याने हे क्षेत्र वाढण्याचा अंदाज कृषी विभागाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. मागील वर्षी कापसाला मिळालेला सर्वाधिक भाव तसेच यावर्षीही कापसाला चांगला भाव मिळेल असा विश्वास शेतकऱ्यांना असल्याने कापूस लागवडीला प्राधान्य देण्यात आले आहे.
शेतकरी कापसाकडे नगदी पीक म्हणून पाहत असतो. मात्र, दरवर्षी विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे कापूस पीक धोक्यात येत असते. त्यामुळं उत्पादनात घट येते. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. यावर्षी हंगामाच्या सुरुवातीला कापूस पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं कापसाची झाडे मोठ्या प्रमाणात मरत आहेत. अशात कापसाचे पीक कसे वाढवावे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. मोठ्या प्रमाणावर महागडे असणारे बियाणे, तसेच मशागत आणि औषधे यांच्यावर शेतकऱ्यांचा खर्च झाला आहे. अशातच आता कापसाची उभी झाडे मोठ्या प्रमाणात मरत असल्यानं पिकासाठी केलेला खर्च शेतकऱ्यांच्या डोक्यावर बसणार आहेत. यातून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार असून, खरीप हंगाम वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.