– तालिबान खवळले, ११ वर्षानंतर अमेरिकेने घेतला बदला
काबुल : अल कायदा या कुख्यात दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अल जवाहिरी याचा अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये ड्रोन हल्ल्यात खात्मा करण्यात आला. अमेरिकेने तब्बल ११ वर्षानंतर हा बदला घेतला आहे. अतिशय नियोजनबद्धरित्या जवाहिरी मारला गेला. त्याच्या हत्येनंतर तालिबान चांगलेच खवळले असून, अमेरिकेला सूड घेण्याची धमकी दिली आहे. यापूर्वी अमेरिकेने ओसामा बिन लादेन या अल कायदाच्या म्होरक्याचे हत्याकांड घडवले होते. त्याच्या जागेवर अल जवाहिरी हा संघटनेचा प्रमुख झाला होता.
अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएच्या खास टीमने अल जवाहिरी याला ड्रोनच्या सहाय्याने टिपले. त्याच्या मृत्यूनंतर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी आम्ही त्याला पाळत ठेवून मारल्याची घोषणा केली व अमेरिकेने आपला बदला पूर्ण केला असल्याचे सांगितले. जवाहिरी हा अफगाणमध्ये तालिबानचे सरकार सत्तेवर आल्यापासून काबुलमध्ये राहात होता. २०२१ पासून त्याला त्याच्या दहशतवादी संघटनेचे मोठे सुरक्षा कवच होते. तरीही सीआयएच्या गुप्तचरांनी जवाहिरी याला हुडकून काढले व आज त्याचा खात्मा केला. या कारवाईने तालिबान खवळले असून, हा दोहा कराराचा भंग असल्याचा आरोप करत, सूड घेण्याची धमकी दिली आहे.
या हत्याकांडानंतर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन प्रसारमाध्यमांना सामोरे गेले. आम्ही जवाहिरी याला हुडकून ठार मारले. अमेरिकेच्या लोकांसाठी जो कुणी धोका बनेल, त्याला असेच संपवले जाईल, असा इशारा बायडेन यांनी दिला. शनिवारी आपल्याच सूचनेवरून काबुलमध्ये हवाई हल्ले करण्यात आले होते, असेही त्यांनी सांगितले. जवाहिरी हा ९/११च्या अमेरिकेवरील हल्ल्याचा सूत्रधार होता, असा अमेरिकेचा आरोप आहे.
————-
Leave a Reply