पावसाने शेतीपिकांचे अतोनात नुकसान; शेतकरी नेते डॉ. टाले, ऋषांक चव्हाण पोहोचले शेतबांधावर!
- शेतकरी उद्धवस्त झाला असताना लोकप्रतिनिधींचे मात्र दुर्लक्ष; शेतकर्यांतून तीव्र संताप!
– तुम्हाला आर्थिक मदतीसाठी सरकारला बाध्य करू, पण धीर सोडू नका; डॉ. टाले व चव्हाण यांचा शेतकर्यांना दिलासा!
मेहकर (तालुका प्रतिनिधी) – मेहकर व लोणार तालुक्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून, शेतीपिकांचे अतोनात नुकसान झालेले असताना, एकही लोकप्रतिनिधी शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी शेतीबांधावर गेला नाही. परंतु, शेतकरी नेते डॉ. विनायक टाले व ऋषांक चव्हाण यांनी कालच तातडीने शेतीबांधावर जात शेतीपिकांच्या नुकसानीची पाहणी केली, व शेतकर्यांना धीर दिला. या नुकसानीची भरपाई देण्यासाठी सरकारला सळो की पळो करून सोडू, आणि तुम्हाला नुकसान भरपाई द्यायला लावू, पण तुम्ही धीर सोडू नका, अशी हाक या हताश व हतबल शेतकर्यांना डॉ. टाले व चव्हाण यांनी दिली आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी अक्षरशः हतबल झाला असून, प्रशासनाने निवडणूक कामांचे कारण सांगून, पंचनामे टाळू नये, तातडीने पंचनामे करून शेतकर्यांना आर्थिक आधार द्या, अशी मागणीही डॉ. टाले व ऋषांक चव्हाण यांनी केली आहे.
मेहकर तालुक्यातील वडाळी व घाटनांद्रा तसेच परिसरातील बर्याच गावांमध्ये अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्यांच्या शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच, गेले काही दिवस सतत पाऊस होत असून, उरलीसुरली पिकेही धोक्यात आली आहेत. त्यामुळे शेतकरी नेते डॉ. ज्ञानेश्वर टाले व ऋषांक चव्हाण यांनी तातडीने कालच शेतकर्यांच्या बांधावर जाऊन शेतीपिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी तूर, कपाशी, तसेच फळबागांचे प्रचंड नुकसान झाल्याचे दिसून आले असून, सोयाबीनच्या सुड्यांमध्येसुद्धा पावसाचे पाणी घुसले आहे. त्यामुळे सदर सोयाबीनला कोंब आले. या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालेला आहे. सरकारने तातडीने आर्थिक मदत दिली नाही तर त्याच्यावर आत्महत्येची वेळ येणार आहे. अशा परिस्थितीत, जिल्हा प्रशासनाने तातडीने नुकसानग्रस्त शेतकर्यांचे पंचनामे करून आवश्यक ती मदत करावी, अशी मागणी शेतकरी नेते डॉ. ज्ञानेश्वर टाले व ऋषांक चव्हाण यांनी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मेहकर व लोणार तालुक्यांत पाऊस कोसळतो आहे. त्यामुळे सोयाबीन या नगदीपिकांसह इतर ही पिकांचे नुकसान झालेले असून, शेतकरी मोठ्या संकटात सापडला असताना, एकाही स्थानिक पुढार्याने शेतकर्यांच्या शेतबांधावर जाण्याची तसदी घेतली नाही. आता या पुढार्यांना मत मागायला देऊ द्या, मग त्यांना सांगू, असे शेतकरी याप्रसंगी बोलताना सांगत होते. तर डॉ. ज्ञानेश्वर टाले व ऋषांक चव्हाण हे शेतकरी नेते तातडीने शेतबांधावर आल्याने शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
————