Head linesLONARMEHAKARVidharbha

पीकविम्याची लढाई आता न्यायालयात लढणार – डॉ. ज्ञानेश्वर टाले

- डोणगाव पोलिस ठाण्यावर शेतकर्‍यांचा ठिय्या; पीकविमा कंपनीविरोधात दाखल केली तक्रार!

– येत्या आठ दिवसात पीकविमा न मिळाल्यास पीकविमा कंपनीचे मेहकर व लोणारचे कार्यालय ठिकाणावर ठेवणार नाही – सहदेव लाड
– सत्ताधारी पुढार्‍यांच्या नाकर्तेपणामुळे शेतकरी पीकविम्यापासून वंचित – डॉ. ऋतुजा चव्हाण

मेहकर (तालुका प्रतिनिधी) – सत्ताधार्‍यांच्या नाकर्तेपणामुळे शेतकरी पीकविम्यापासून वंचित आहेत. त्यामुळे पीकविम्याची लढाई आता न्यायालयातच लढू, व या सरकारसह पीकविमा कंपनीला दणका देऊ, अशा शब्दांत शेतकरी नेते डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी आक्रमक भूमिका घेतली. तर, येत्या आठ दिवसांत पीकविमा न मिळाल्यास पीकविमा कंपनीचे मेहकर व लोणार येथील कार्यालय ठिकाणावर ठेवणार नाही, असा इशारा शेतकरी नेते सहदेव लाड यांनी दिला. पीकविम्याच्या प्रश्नावर सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी आता मूग गिळले असून, सत्ताधार्‍यांच्या नाकर्तेपणामुळेच बहुतांश शेतकरी पीकविम्यापासून वंचित आहे, असा गंभीर आरोप शेतकरी नेत्या तथा मेहकर-लोणार विधानसभा मतदारसंघातील शेतकरी, कष्टकरी, बहुजनांच्या उमेदवार डॉ. ऋतुजा चव्हाण यांनी केला. पीकविम्यापासून वंचित राहिलेल्या हजारो शेतकर्‍यांनी आज डोणगाव पोलिस ठाण्यावर धडक दिली व पीकविमा कंपनीविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली. यावेळी संतप्त शेतकर्‍यांनी पोलिस ठाण्यात ठिय्यादेखील दिला होता. पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

आज डोणगांव पोलीस स्टेशन हद्दीतील खरिपाचा सन २०२३-२४ चा पीकविमा न मिळालेले शेतकरी तसेच रब्बीचा पीकविमा न मिळालेले अशा जवळपास ४७५ शेतकर्‍यांनी आपले पीकविम्याचे अर्ज तक्रार म्हणून पोलीस स्टेशन अधिकारी अमरनाथ नागरे यांच्याकडे जमा केले व शेतकर्‍यांनी मागणी केली की, पीकविमा कंपनीने आमची फसवणूक केली असून, संबंधितांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात यावे. याप्रसंगी शेतकरी नेते डॉ.ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वात व डॉ.ऋतुजाताई चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या देण्यात आला. जोपर्यंत पीकविमा कंपनीवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत एकही शेतकरी या ठिकाणाहून उठणार नाही, असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला. त्यानंतर ठाणेदार नागरे यांनी तक्रार घेण्यासाठी संतोष धोंडीबा टाले, रामभाऊ प्रल्हाद लोणकर, विठ्ठल नथुजी काळदाते, नारायण वसंतराव कराळे, या चार शेतकर्‍यांना बोलावले व प्रमुख पदाधिकार्‍यांसह शेतकर्‍यांसोबत चर्चा केली, की आपण तक्रार द्या, ती तक्रार घेऊन कायदेशीर कारवाईसाठी संबंधित विभागाला पत्र काढून तसेच आमच्या वरिष्ठालासुद्धा पत्र देऊन याबाबत कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे लेखी दिले. त्यानंतर शेतकरी शांत झाले. यावेळी डॉ.ऋतुजाताई चव्हाण यांनी सांगितले की, राज्य सरकारने त्यांचा हिस्सा पीकविमा कंपनीकडे जमा करावा. जेणेकरून तातडीने पीकविमा मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. तसेच राज्य सरकारने त्यांचा हिस्सा जमा न केल्यास रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलन करू.
यावेळी डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी सांगितले की, आम्ही आमचा हक्क मागतोय. पीकविमा मिळवून घेणे हा शेतकर्‍याचा अधिकार आहे. तब्बल दहा महिने झाल्यामुळे १२ टक्के व्याजासहित पीकविमा रक्कम मिळाली पाहिजे, असा कायदा आहे. तसेच जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी शिफारस केल्याप्रमाणे नियमाने १८ टक्के व्याजदराने रक्कम मिळायला पाहिजे. अन्यथा पीकविम्याचे कार्यालय ठिकाणावर ठेवणार नाही, असे सहदेव लाड यांनी सांगितले. ही लढाई एवढ्यावरच थांबणार नसून, पीकविमा न मिळाल्यास शेतकर्‍यांचे अर्ज घेऊन न्यायालयात याचिका दाखल करू. शेतकर्‍यांना एक रुपयाही खर्च लागणार नाही, असे ऋषांक चव्हाण म्हणाले. यावेळी देवेंन्द्र आखाडे, अरविंद दांदडे, गणेश धाबे, अनिल लांडगे, अविनाश टाले, नारायण कर्‍हाळे, शरद देशमुख, शंकरराव टाले, सलीम शहा, जावेद खाँसाब, मोहन चव्हाण, अदिनाथ लोकडे, गजानन टोन्चर, प्रभाकर शिंदे, रामेश्वर वायाळ, दिलीप टाले, राजू पळसकर, तेजराव देशमुख, उमेश वैद्य, रणजीतराव देशमुख, प्रभाकर शिंदे, रामेश्वर वायाळ, दिलीप टाले, राजू पळसकर व शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पावसाने शेतीपिकांचे अतोनात नुकसान; शेतकरी नेते डॉ. टाले, ऋषांक चव्हाण पोहोचले शेतबांधावर!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!