Breaking newsHead linesMaharashtraPolitical NewsPolitics

महाआघाडीत जागावाटपाचा घोळ सुरूच; उद्या उद्धव ठाकरे व शरद पवारांशी चर्चा!

- भाजपाकडून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न; काँग्रेस-शिवसेनेत कसलेही वाद नाहीत

– काँग्रेसची ९६ जागांवरची चर्चा पूर्ण – नाना पटोले

मुंबई/नवी दिल्ली (प्रतिनिधी) – महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, जागावाटपाची चर्चा सुरु असून, ही चर्चा लवकरच पूर्ण होईल. आतापर्यंत काँग्रेसच्या ९६ जागांवरील चर्चा पूर्ण झाली असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी उद्या पुन्हा चर्चा केली जाणार आहे. या चर्चेनंतर उद्याच उमेदवारांची यादी जाहीर करण्याचा प्रयत्न असेल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले आहे. दरम्यान, महाआघाडीत जागावाटपाचा घोळ आज दिवसभरही कायम होता, त्यामुळे उमेदवारी याद्या जाहीर करणे रखडले असल्याचे दिसून येत आहे. भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची यादी येणे बाकी आहे. या यादीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. विरोधकांसोबत पक्षातील नेतेही या यादीची वाट पाहत आहेत. कारण कोणाला उमेदवारी मिळणार? कोणाची जागा जाणार? हे सर्व यातून उघड होणार आहे.

दिल्लीत प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, शिवसेना आघाडीतून बाहेर पडणार या बातम्यात काहीही तथ्य नाही, भारतीय जनता पक्ष जाणीवपूर्वक विरोधी पक्षांबद्दल गैरसमज पसरवण्याचे प्रयत्न करत आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाचा दारूण पराभव होईल. पराभवाच्या भितीने भाजपा अशी खेळी करत आहे. काँग्रेस कडूनही अशा पद्धतीचे कोणतेही विधान केलेले नाही. महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रात आणण्यासाठी आमच्या सर्वांचे एकत्रित सर्वांचे प्रयत्न सुरु आहेत. एका प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, भाजपाचे हिंदू प्रेम नकली आहे, नरेंद्र मोदी सत्तेत आले आणि स्वयंभू विश्वगुरु असा प्रचार करण्यात आला. या ११ वर्षात शेतकऱ्यांचा आत्महत्यांमध्ये वाढ झाली त्यात जास्त हिंदूच होते. बेरोजगाराला कंटाळून तरुणांच्या आत्महत्या झाल्या त्यातही जास्त हिंदूच आहेत. भाजपाची सत्ता आली की हिंदूवर अन्याय केला जातो हे लपून राहिले नाही. भाजपाचे हिंदुत्व हे केवळ राजकारणासाठी आहे. छत्रपती संभाजीनगर असे नामकरण केले असे जाहीरपणे सांगायचे व उमेदवारांच्या यादीत औरंगाबाद लिहायचे ही दुतोंडी भूमिका आहे. काँग्रेस पक्षाची सर्वधर्म समभावाची स्पष्ट भूमिका आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!