वंचित आघाडीकडून दिग्गज मैदानात; मेहकरातून डॉ. ऋतुजा चव्हाण, मूर्तिजापुरातून सुगत वाघमारेंना संधी!
- मेहकर विधानसभेची राजकीय गणिते बदलणार; डॉ. संजय रायमुलकर, सिद्धार्थ खरात दोघेही अडचणीत?
– वंचित बहुजन आघाडीकडून पाचवी यादी जाहीर; १६ उमेदवारांचा समावेश
अकोला (जिल्हा प्रतिनिधी) – गेल्या काही दिवसांपासून मेहकर-लोणार विधानसभा मतदारसंघात जोरदार लाट निर्माण करणार्या व उपेक्षित, वंचित घटकांचा मोठा पाठिंबा लाभलेल्या डॉ. ऋतुजा ऋषांक चव्हाण यांच्यासह प्रसिद्ध उद्योगपती सुगत वाघमारे यांच्यासह १६ उमेदवारांची पाचवी यादी वंचित बहुजन आघाडीने आज (दि.२१) जाहीर करत, राजकीय धमाका उडविला आहे. या यादीमध्ये अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सर्व समाजघटकांतील उमेदवारांना संधी दिली आहे. डॉ. ऋतुजा चव्हाण यांच्या उमेदवारीमुळे मेहकरात प्रस्थापित नेत्यांना मोठा धक्का बसणार असून, शिवसेना (ठाकरे) पक्षाचे संभाव्य उमेदवार सिद्धार्थ खरात यांचीही जागा धोक्यात आली असल्याची राजकीय चर्चा आहे. विशेष म्हणजे, डाॅ. ऋतुजा चव्हाण यांना वंचित आघाडीची उमेदवारी मिळणार असल्याचे वृत्त सर्वप्रथम ब्रेकिंग महाराष्ट्रने दिले होते, ते तंतोतंत खरे ठरले आहे.
– वंचित बहुजन आघाडीच्या पाचव्या यादीतील उमेदवार –
१) जगन देवराम सोनवणे – भुसावळ
२) डॉ. ऋतुजा चव्हाण – मेहकर
३) सुगत वाघमारे – मूर्तीजापूर
४) प्रशांत सुधीर गोळे – रिसोड
५) लोभसिंग राठोड – ओवळा माजिवडा
६) विक्रांत चिकणे – ऐरोली
७) परमेश्वर रणशुर – जोगेश्वरी पूर्व
८) राजेंद्र ससाणे – दिंडोशी
९) अजय रोकडे – मालाड
१०) अॅड. संजीवकुमार कलकोरी – अंधेरी पूर्व
११) सागर गवई – घाटकोपर पश्चिम
१२) सुनीता गायकवाड – घाटकोपर पूर्व
१३) आनंद जाधव – चेंबूर
१४) मंगलदास निकाळजे – बारामती
१५) अण्णासाहेब शेलार – श्रीगोंदा
१६) डॉ. शिवाजीराव देवनाळे – उदगीर
मेहकरातून उमेदवारी मिळालेल्या डॉ. ऋतुजा चव्हाण या शेतकरी नेत्या असून, त्यांच्यासह त्यांचे पती ऋषांक चव्हाण यांनी शेतकरी चळवळीत मोठे योगदान दिलेले आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर, डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्यासह त्यांनी सद्या पीकविमाप्रश्नी सरकार व सत्ताधारी आमदारांना चांगलेच धारेवर धरलेले आहे. गावोगावी त्यांच्या शेतकरी मेळाव्यांना जोरदार प्रतिसाद मिळत असून, जातीय समिकरणात त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. दलित, ओबीसी, मराठा या समाजासह शेतकरी, कष्टकरी या घटकांचा त्यांना मोठा पाठिंबा असून, या मतदारसंघात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना लीड मिळवून देण्यात डॉ. टाले यांच्यासह ऋषांक चव्हाण यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे शेतकरी चळवळीचे मतदारही डॉ. चव्हाण यांच्या मागीमागे एकवटल्याचे दिसून येत आहे.
दुसरीकडे, भाजपच्या अंतर्गत वादात अडकलेल्या अकोला जिल्ह्यातील महत्वाच्या अशा मूर्तिजापूर मतदारसंघातून प्रसिद्ध उद्योगपती सुगत वाघमारे यांना अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपने जाहीर केलेल्या यादीत अकोला पूर्वसाठी रणधीर सावरकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली, परंतु या ठिकाणचे भाजपचे आमदार हरिष पिंपळे यांना वेटिंगवर ठेवले. या मतदारसंघात अनुसूचित जाती प्रवर्गातील मतदारांचा मोठा प्रभाव असून, वाघमारेंच्या उमेदवारीमुळे भाजपसह महाआघाडीला येथील निवडणूक कठीण झालेली आहे.
———-