पहिल्याच यादीत भाजपकडून तब्बल १३ महिला नेत्यांना उमेदवारी
- एकनाथ शिंदे गटाच्या पाच जागांवर दिले भाजपने उमेदवार - अनेक ठिकाणी भाजपवर बंडखोरांची टांगती तलवार!
मुंबई (प्रतिनिधी) – भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आपली पहिली यादी जाहीर केली असून, त्यात ९९ जणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या यादीत, १३ महिलांना संधी देण्यात आली आहे. चिखलीच्या आमदार श्वेताताई विद्याधर महाले यांचे नाव पहिल्याच यादीत आले आहे तर, भोकरमधून राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया अशोक चव्हाण यांनाही पक्षाकडून संधी देण्यात आली आहे. शेवगाव-पाथर्डीमध्ये मोनिकाताई राजळे यांना प्रचंड विरोध होत असतानाही पक्षाने पुन्हा त्यांनाच उमेदवारी दिली आहे. तर श्रीगोंद्यातून बबनराव पाचपुते यांच्याऐवजी प्रतिभाताई पाचपुते यांना संधी मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर चव्हाण कुटुंबीयांची तिसरी पिढी आता राजकारणात आली आहे. विशेष म्हणजे, यापैकी पाच जागा या भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या खेचल्या असून, त्यात धुळे शहर, अचलपूर, देवळी, नालासोपारा, उरण या मतदारसंघांचा समावेश आहे.
धुळे येथे २०१९ साली शिवसेनेचे हिलाल माळी हे उमेदवार होते, मात्र येथून भाजपने यंदा अनुप अग्रवाल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अचलपूर येथे शिवसेनेकडून सुनीता फिसके या उमेदवार होत्या, येथे भाजपने आता अतुल तायडे यांना उमेदवारी दिली आहे. देवळी मतदारसंघात शिवसेनेचे समीर देशमुख उमेदवार होते, त्यांचा मागच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता, यंदा भाजपने राजेश बकाने यांना उमेदवारी दिली आहे. नालासोपारा येथे शिवसेनेकडून प्रदीप शर्मा उमेदवार होते, यंदाच्या निवडणुकीत भाजपने राजन नाईक यांना उमेदवारी दिली आहे. तर उरण येथे शिवसेनेकडून मनोहर भोईर हे उमेदवार होते, यंदा भाजपने महेश बालदी यांना उमेदवारी घोषित केली आहे.
भाजपच्या पहिल्या यादीमध्ये पूर्वीच्या दोन आमदारांचे तिकिट कापण्यात आले आहे. यामध्ये कामठी मतदारसंघामध्ये भाजपचे टेकचंद सावरकर हे आमदार होते. मात्र यावेळी त्यांचा पत्ता कट करण्यात आला असून, त्यांच्याजागी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आता निवडणूक लढवणार आहेत. तर दुसरीकडे चिंचवड विधानसभा मतदारसंघातून अश्विनी जगताप यांच्याऐवजी भाजपकडून शकंर जगताप हे निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत.
भाजपच्या पहिल्या यादीत १३ महिलांना संधी मिळाल्याने याबाबतीत मात्र भाजपने आघाडी घेतली आहे. यामध्ये भोकरमधून श्रीयजा चव्हाण यांना भाजपने विधानसभेचे तिकीट दिले आहे. श्रीजया चव्हाण या माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण यांच्या कन्या आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडचिठ्ठी देत कमळ हाती घेतले होते. त्यानंतर त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले. तर आता विधानसभेला त्यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अशोक चव्हाण यांचा राजकीय वारसा आता त्यांच्या कन्या श्रीजया चव्हाण या पुढे नेणार आहेत. श्रीजया चव्हाण या राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या होत्या. त्याचवेळी त्यांच्या खर्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली होती.
—
– भाजपने महिलांना दिलेली संधी –
– श्रीजया अशोक चव्हाण – भोकर
– अनराधाताई अतुल चव्हाण – फुलंब्री
– सीमाताई महेश हिरे – नाशिक पश्चिम
– सुलभा गायकवाड – कल्याण पूर्व
– मंदा विजय म्हात्रे – बेलापूर
– मनिषा अशोक चौधरी – दहिसर
– गोरेगांव – विद्या ठाकूर
– माधुरी सतीश मिसाळ – पर्वती
– मोनिका राजीव राजळे – शेगाव-पाथर्डी
– प्रतिभा पाचपुते – श्रीगोंदा
– नमिता मुंदडा – केज
– श्वेता महाले – चिखली
– मेघना बोर्डीकर – जिंतूर
————–
बुलडाणा जिल्हयात भाजपाचे उमेदवार जाहिर !