रोह्यांचा सुळसुळाट झाला; वाकी बुद्रूकच्या शेतकर्याचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन!
चिखली (एकनाथ माळेकर) – बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा, चिखली, मेहकर, लोणार, सिंदखेडराजा तालुक्यांत रोही (नीलगाय) यांचा सुळसुळाट झाला असून, हे वन्यप्राणी शेतीपिकांची अतोनात नासाडी करत आहेत. या बाबत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’नेदेखील सविस्तर वृत्त प्रसारित केले होते. त्यानंतर आज देऊळगाव राजा तालुक्यातील वाकी बुद्रूक येथील शेतकरी उद्धव राजे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावला व रोह्यांच्या त्रासाची आणि शेतीपिकांच्या नासाडीची माहिती त्यांच्या कानावर टाकली. या फोननंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने वनविभागाला कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्यात. तसेच, महसूल विभागालाही नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत.
बुलडाणा जिल्ह्यासह विदर्भ, मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत रोही (नीलगाय) या वन्यप्राण्याचा हौदोस सुरु आहे. सोयाबीन, उडीद, मूग, कपाशी आदी पिकांची हे प्राणी नासाडी करत आहेत. त्यामुळे शेतकरी परेशान झाले असून, हातातोंडाशी आलेला घास निघून जात असल्याने हतबल आहेत. याबाबत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’नेही वृत्त प्रसारित करून वन विभागाने पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. त्यानंतर, आज उद्धव राजे या वाकी बुद्रूक (ता. देऊळगावराजा) येथील शेतकर्याने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावला व आपली वैâफियत ऐकवली. मुख्यमंत्र्यांनीही ती शांततेने ऐकून घेत, आपल्या स्वीय सहाय्यकांना तक्रार नोंदवून घेण्यास सांगितले. त्यानंतर महसूल व वनविभागाच्या सचिवांना फोन लावून तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
देऊळगाव राजा तालुक्यातील वाकी बुद्रूक येथील शेतकरी उद्धव राजे यांनी डायरेक्ट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करून शेतकर्याची काय अवस्था आहे, याची माहिती दिली. अस्मानी व सुलतानी संकटात भरडल्या जात असून, नीलगाय यांच्या त्रासापासून डोंगराळ भागातील शेतकरी त्रस्त आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंट थोडीशी मदत करते. त्यामध्येसुद्धा एजंट सक्रिय झाले आहे. अर्धे तुम्ही अर्धे आम्ही अशा प्रकारची नीलगाईने नुकसान केलेल्या भागात मदतीची गंमत सुरु आहे. पेरणी केल्यापासून सतत पाऊस असल्यामुळे शेतीमधील मार्ग बंद आहेत. संपूर्ण, मेरा, अंत्रीखेडेकर, धोत्रा, देऊळगाव मही, इसरूळ-मंगरूळ, मिसाळवाडी, या भागामध्ये खडकाळ जमीन असल्यामुळे व फॉरेस्ट डिपारमेंट चे जंगल असल्यामुळे या भागामध्ये नीलगाय प्रमाण जास्त आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी या प्राण्यापासून त्रस्त आहे.