शिंदे सत्तापिपासू, उद्या मोदींना पंतप्रधानपदही मागतील; ज्यांना मुख्यमंत्री व्हायचे होते. ते उपमुख्यमंत्री झाले, फडणवीसांनाही उद्धव ठाकरे यांचा टोला!
मुंबई (ब्रेकिंग महाराष्ट्र) – फुटीरांना लालसा आहे, एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपद वाईट पद्धतीने मिळवले. नरेंद्रमोदींसोबतही ते तुलना करतील आणि पंतप्रधानपद मागतील, लालसा आणि सत्तेची चटक त्यांना आहे ते सत्तापिपासू आहेत. अशी जहरी टीका शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
दैनिक सामनामध्ये उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग प्रसिद्ध झाला आहे. शिवसेना नेते तथा कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला. येत्या ऑगस्टपासून राज्यात दौरे करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. उद्धव ठाकरे यांनी आजच्या मुलाखतीच्या शेवटच्या भागात भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली. तसेच यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली आहे. ज्यांना मुख्यमंत्री व्हायचे होते. ते उपमुख्यमंत्री झाले आहेत, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना केला होता. त्यावर उपरवाले की मेहरबानी, असे उत्तर त्यांनी दिले. हा उपरवाला त्यांचे त्यांना माहीत, असेही ते म्हणाले.