जीएसटी, बेरोजगारी, महागाईप्रश्नी विरोधकांचा संसदेत गदारोळ, विरोधी पक्षाचे १९ खासदार सस्पेंड
नवी दिल्ली (ब्रेकिंग महाराष्ट्र) – जीएसटी, बेरोजगारी, महागाईप्रश्नी केंद्रातील मोदी सरकारला धारेवर धरत, संसदेत गदारोळ घालणार्या विरोधी पक्षाच्या तब्बल १९ खासदारांना एक आठवड्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. विरोधकांचा आक्रमकपणा पाहाता, सरकारने अखेर महागाईप्रश्नी चर्चेची तयारी दाखवली आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात महागाई, बेरोजगारी व जीएसटीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी मोदी सरकारला धारेवर धरलेले आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांत जोरदार विरोध होत असून, सरकारने याप्रश्नी चर्चा करावी, अशी मागणी विरोधक करत आहेत. याच मागणीसाठी गदारोळ घालणार्या तृणमूल काँग्रेसच्या ७, डीएमकेच्या ६, कम्युनिस्ट २, टीआरएस ३ व सीपीआयच्या एका खासदाराला आठवडाभराकरिता अध्यक्षांनी निलंबित केले आहे. यावर तृणमूलचे वरिष्ठ खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी तीव्र निषेध करत, मोदी व शाह यांनी लोकशाहीलाच निलंबित केले आहे, खासदारांची काय गोष्ट घेऊन बसलात, अशा शब्दांत सरकारचा निषेध केला.
यापूर्वी मंगळवारी काँग्रेसच्या चार खासदारांना निलंबित करण्यात आले असून, सरकार विरोधकांची मुस्कटदाबी करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.