महाराष्ट्र, झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला!
- महाराष्ट्रात २० नोव्हेंबररोजी एकाच टप्प्यात मतदान; २३ नोव्हेंबररोजी निकाल
– आजपासून राज्यात आचारसंहिता लागू!
नवी दिल्ली (आवेश तिवारी) – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल अखेर फुंकला गेला आहे. महाराष्ट्र विधानसभेसाठी २० नोव्हेंबररोजी मतदान घेतले जाणार असून, २३ नोव्हेंबररोजी निकाल जाहीर केला जाईल, अशी घोषणा केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज (दि.१५) नवी दिल्लीत केली. तर झारखंड राज्यात दोन टप्प्यात निवडणूक पार पडणार असून, १३ व २० नोव्हेंबररोजी मतदान घेतले जाईल व २३ नोव्हेंबररोजी निकाल जाहीर केला जाणार आहे.
महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर २०२४ रोजी संपुष्टात येणार आहे. एकूण २८८ जागांसाठी ही निवडणूक घेतली जाणार असून, त्यासाठी राज्य निवडणूक आयोग सज्ज आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, की महाराष्ट्रात ९.६३ कोटी मतदार असून, त्यात ४.९७ पुरूष तर ४.६६ कोटी स्त्री मतदार आहेत. विशेष म्हणजे, १.८५ कोटी मतदार हे २० ते २९ वर्षे वयोगटातील तरूण आहेत. तर २०.९३ लाख मतदार हे पहिल्यांदाच मतदानाला सामोरे जाणारे युवा मतदार आहेत. एकूण २८८ जागांसाठी मतदान घेतले जाणार असून, राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी १४५ हा जादुई आकडा आहे.
महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला एका टप्प्यात निवडणूक घेतली जाणार आहेत. तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. गॅझेट नोटिफिकेशनची तारीख २२ ऑक्टोबर असेल तर २९ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल. ३० ऑक्टोबरला अर्जांची छाननी केली जाणार आहे. तर अर्ज मागे घेण्याची तारीख ४ नोव्हेंबर २०२४ अशी असणार आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना त्यांची पार्श्वभूमी तीनवेळा वृत्तपत्रात द्यावी लागेल. मुख्य आयुक्त राजीव कुमार म्हणाले, की आम्ही जेव्हा महाराष्ट्रात बैठका घेतल्या तेव्हा आम्ही त्यासंदर्भातले कठोर निर्देश आम्ही राज्य निवडणूक आयोग आणि इतर अधिकार्यांना दिल्या आहेत. निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव आहे. त्यात सर्व मतदारांचा सहभाग आवश्यक आहे. संपूर्ण मतदान प्रक्रियेचे व्हिडिओ शुटिंग केले जाणार आहे. मतदान केंद्राबाहेर जास्त रांग असेल तर मतदारांच्या सुविधेसाठी खुर्च्या ठेवल्या जाणार आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदावारांची माहिती निवडणूक आयोगाला द्यावी लागणार आहे. पैसे, मद्य, ड्रग्स वाटपावर कडक नजर ठेवली जाणार आहे. मतदान केंद्र दोन किलोमीटरच्या आत असावेत, अशा सूचना राज्य निवडणूक आयोगाला केल्याचेही राजीव कुमार यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन प्रमुख पक्ष फुटल्यानंतर विधानसभेची पहिली निवडणूक होत आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असेल. महायुती आणि महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात आल्याचे सांगितले जात असून, येत्या काही दिवसात उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली जाणार आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे. तर लाडक्या बहिणींसाठी दीड हजार रूपये दरमहा देऊनदेखील राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारविरूद्धचा संताप कमी होण्याचे नाव नसून, शेतकरी, युवक, कामगार, शासकीय नोकरदार हे घटक सरकारवर नाराज असल्याचे दिसून येत आहे. तसेच, पक्षांच्या फोडाफोडीमुळेही सरकारविरुद्ध नाराजी असून, मराठा व धनगर आरक्षणाचा मुद्दा गंभीर बनलेला आहे.
————