अमडापूर पोलिस ठाण्यावर शेतकर्यांसह सरनाईक, चव्हाण, डॉ. टाले यांची धडक!
- पीकविम्याची रक्कम न दिल्यास या सरकारला धडा शिकवू - सरनाईक
– शासन फक्त घोषणा देत सुटलय, उर्वरित शेतकर्यांना पीकविम्याची रक्कम कधी देणार – ऋषांक चव्हाण
चिखली (तालुका प्रतिनिधी) – गेल्या आठवड्यापासून चिखली तालुक्यात उर्वरित शेतकर्यांना पीकविमा रक्कम मिळवून देण्यासाठी शेतकरी नेते विनायक सरनाईक, डॉ. ज्ञानेश्वर टाले, ऋषांक चव्हाण, नितीन राजपूत यांच्या नेतृत्वात जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. अनेक गावांमध्ये अॅड. शर्वरी तुपकर यादेखील शेतकर्यांना मार्गदर्शन करीत असून, या सरकारच्या दुटप्पी धोरणाला उघडे पाडत आहे. शासन घोषणांचा पाऊस पाडत असतांना खरीप व रब्बीचा सन २०२३ चा राज्य शासनाचा हिस्सा कंपनीला न दिल्याने रखडलेली २३३ कोटी रूपये रक्कम मात्र दिली जात नसल्याने दि. १४ ऑक्टोंबरपासून शेतकर्यांच्या नावाने सविस्तर पुराव्यासहित तक्रार (फिर्याद) हद्दीतील पोलीस स्टेशनला दिल्या जात आहेत. आज शेतकरी नेते विनायक सरनाईक, ऋषांक चव्हाण, नितीन राजपूत यांच्या नेतृत्वात अमडापूर पोलिस ठाण्यावर या पोलिस ठाणेहद्दीतील शेकडो शेतकर्यांनी धडक देत, एआयसी पीकविमा कंपनी विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. तर जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या आदेशानुसार चौकशी करुन शेतकर्यांना न्याय देण्याचे अश्वासन पोलीस निरीक्षक निर्मळ यांना दिले आहे.
यानंतर मौजे टाकरखेड येथे शेतकर्यांची बैठक पार पडली. यावेळी बोलतांना विनायक सरनाईक यांनी झोपेत असलेल्या राज्यकर्ते यांनी जागे व्हावे आणि आचारसंहिता लागण्यापूर्वी उर्वरित विमा रक्कम कंपनीला अदा करावी. विमा कंपनी शासनाला वारंवार मागणी करीत आहे. परंतु शेतकर्यांचा हक्काचा विमा मात्र दिला जात नसल्याने याची परतफेड शेतकरी नक्की करतील. मंत्रालयात अनेक बैठका झाल्या अनेक निर्णय शासन घेतांना दिसतय मात्र शेतकरी हिताच्या दृष्टीने निर्णय होत नसल्याने आमचे शेतकरी लाडके नाहीत का? असा सवाल सरनाईक यांनी उपस्थित केला. शासनाने उर्वरीत हिस्सा अदा केला तरच आम्ही मतदानरूपी आशीर्वाद देऊ, असे मत गावागावातील शेतकरी उपस्थित करीत असल्याने याची सत्ताधारी नेत्यांनी वेळीच दखल घेऊन लोकसभेची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे झाले आहे. अन्यथा जनता मात्र राज्य शासनाने कंपनीला विमा हिस्सा दिला नसल्याने हिसका दाखविल्याशिवाय शेतकरी राहणार नाही, असे चित्र जिल्हाभरात दिसत आहे, असे सरनाईक यांनी सांगितले.
हे सरकार शेतकर्यांची दिशाभूल करत असून, उर्वरित शेतकर्यांना पीकविमा देण्यास टाळाटाळ करत आहे. पीकविमा कंपनी सरकारकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटक आहेत, तर आमचे लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प बसले आहेत. शेतकर्यांचा पीकविमा तातडीने द्या, अन्यथा शेतकरी निवडणुकीत धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा ऋषांक चव्हाण यांनी दिला आहे.
———-