अतिवृष्टीचा दीड लाख हेक्टरवरील पिकांवर नांगर!
- जाता जाता दणका दिलाच; परतीचा पाऊस जिल्ह्यात अवकाळीसारखा बरसला!
– घाटाखाली अवकृपा; घाटावरही फटका!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात परतीचा पाऊस चांगलाच बरसला, या पावसामुळे जवळजवळ १ लाख ४७ हजार ८० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा कृषी विभागाचा आहे. विशेषतः पावसाचा जास्त जोर घाटाखालीच दिसून आला. दरम्यान, नुकसान झालेल्या पीकविमाधारक शेतकर्यांनी ७२ तासाच्याआत आपली नुकसानाची संबंधित विमा कंपनीकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात गेल्या ऑगस्ट महिन्यात पावसाने चांगलीच धूम केली होती. या पावसामुळे शेती पिकांचे नुकसान होऊन काही भागातील जमीनसुद्धा खरडून गेली होती. तसेच सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाही चांगलाच पाऊस बरसला. यामुळे शेती व पिकांचे नुकसान होऊन पाणी शेतात साचल्याने सोयाबीन, कापूस, तूरसह इतर पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. सदर नुकसानीची पीकविमाधारक शेतकर्यांनी संबंधित पीकविमा कंपनीकडे तक्रारीसुध्दा नोंदवल्या होत्या. सदर तक्रारीची पीकविमा कंपनीकडून खातरजमासुद्धा करण्यात आली. परंतु अद्यापपर्यंत या नुकसानीचा छदामही शेतकर्यांना मिळाला नाही.
पीकविमाधारक शेतकर्यांनी ७२ तासांच्याआत तक्रारी नोंदवाव्यात!
सदर पावसामुळे झालेल्या नुकसानीची पीकविमाधारक शेतकर्यांनी ७२ तासाच्याआत भारतीय कृषी विमा कंपनीकडे तक्रार नोंदवावी. यासाठी विमा कंपनीच्या तालुका प्रतिनिधीकडे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.
दरम्यान, जिल्ह्यात ९ ते १४ ऑक्टोबर यादरम्यान परतीचा पाऊस चांगलाच बरसला. या पावसामुळे कापूस, सोयाबीन, तूर, मका, केळी, भाजीपालासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले. सदर पावसाचा घाटाखाली जोर जास्त दिसला. या पावसामुळे बुलढाणा तालुक्यातील ४८ बाधित गावातील २७२५ शेतकर्यांचे ८७५ हेक्टर, चिखली तालुक्यातील ५ गावातील ३३ हजार ३४८ शेतकर्यांचे २६ हजार हेक्टर, मोताळा तालुक्यातील ११६ गावातील २१ हजार १८२ शेतकर्यांचे १८ हजार २४० हेक्टर, मलकापूर तालुक्यातील ८७ गावातील १२ हजार ५७० शेतकर्यांचे २४ हजार ९०१ हेक्टर, खामगाव तालुक्यातील १८ गावातील ३८९ शेतकर्यांचे २६८ हेक्टर, नांदुरा तालुक्यातील ९२ गावातील २४ हजार शेतकर्यांचे ३१ हजार ५१३ हेक्टर, जळगाव जामोद तालुक्यातील ११० गावातील ३२ हजार ६८ शेतकर्यांचे ३० हजार ८१३ हेक्टर, संग्रामपूर तालुक्यातील १०६ गावातील ३२ हजार ९८० शेतकर्यांचे ३७ हजार ३०७ हेक्टर व सिंदखेडराजा तालुक्यातील ४ गावातील १२४९ शेतकर्यांचे ४९८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सदर अतिवृष्टीमुळे मलकापूर तालुक्यातील ६५ हेक्टर जमीन खरडून गेली आहे. कृषी विभागाचा हा प्राथमिक अंदाजित अहवाल असून, यात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अतिवृष्टीमुळे चालू हंगामातही शेतकर्यांचे नुकसान सुरूच असताना शासनाकडून मात्र पाहणी व पंचनामेच सुरू असून, अद्यापही कोणाला यावर्षीची मदत मिळाल्याची माहिती नाही. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीच्या नुकसानीच्या मदतीचे पैसेही अजून कित्येक शेतकर्यांना मिळाले नाही, तर पीकविम्यासाठीसुद्धा शेतकरी कृषी विभागाचे दरवाजे झिजवत आहेत. तरी सदर नुकसानीचा सर्वे करून तातडीने भरपाई द्यावी, अशीदेखील मागणी शेतकरी करत आहेत.