साखरखेर्डा परिसरात पावसाने दाणादाण; कपाशीची नासाडी!
- मेघगर्जनेसह कोसळला पाऊस, कपाशीची झाडे पडली, पातेही गळाली!
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – साखरखेर्डा येथे आणि परिसरात काल रात्री मेघगर्जनेसह परतीचा पाऊस पडल्याने कपाशी पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. तर अनेकांनी सोयाबीन सोंगून ठेवले असल्याने त्यांचेही नुकसान झाले आहे. या पिकाचा महसूल विभागाने तत्काळ पंचनामे करून शेतकर्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.
दिवसभर कडकडीत ऊन पडल्याने पाऊस येणार नाही, असे वाटले होते. परंतु, पाच वाजता हळूहळू आकाशात ढग भरून आले. आणि सायंकाळी सहा वाजता पावसाला सुरुवात झाली. हळूहळू पावसाने चांगलीच हजेरी लावताच, विजांचा प्रचंड गडगडाट आणि पावसाच्या सरी वेगाने वाढत गेल्या. साडेसात नंतर पावसाचा जोर वाढला. रात्र झाल्याने शेतकरी पावसात शेताकडे धावले. शेतात सोंगून ठेवलेले सोयाबीन झाकण्यासाठी एकच तारांबळ उडाली. अनेक दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने तुरीच्या पिकाला पोषक असाच पाऊस पडल्याने शेतकरी सुखावला आहे. परंतु, दुसरीकडे, आज सकाळी शेतकरी शेतावर गेला असता कपाशी पिकाची झाडे वादळीवार्यामुळे खाली पडली होती. बोंड पातीचा सडा पडला होता. या भागातील शेतकर्यांनी सीड्स प्लॉट घेतलेले असून, त्या प्लॉटचे नुकसान झाले आहे. साखरखेर्डा, सवडद, मोहाडी, राताळी, गोरेगाव, उमनगाव, पांग्रीकाटे, बाळसमूंद्र, पिंपळगाव सोनारा, मेरा बु., अंत्रीखेडेकर, दरेगाव, तांदुळवाडी, गुंज, वरोडी या भागातील शेतकर्यांनी सोयाबीन सोंगणीला प्रारंभ केला आहे. काहींनी आपले पिक सोंगून सुडी मारुन ठेवले आहे. तर काही शेतकर्यांच्या शेतात कापणी सुरु असताना पावसाने हजेरी लावल्याने सोयाबीनची वाट लावली आहे. दुसरीकडे हा पाऊस रब्बी हंगामात हरबरा पिकासाठी पोषक असाच पडल्याने शेतकर्यांना शेत जमीन तयार करायला सवड मिळणार आहे.