Head linesMEHAKARPolitical NewsPoliticsVidharbha

पीकविम्यासाठी साखरखेर्डा पोलिस ठाण्यात ठिय्या; शेतकरी आक्रमक!

- तत्काळ पीकविमा द्या, नाही तर रस्त्यावर उतरू - डॉ.ऋतुजा चव्हाण

– कंपनीवर गुन्हा दाखल होईपर्यंत हटणार नाही, शेतकरी नेत्यांसह शेतकरी आक्रमक

सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी) – शेतकर्‍यांच्या हक्काची पीकविमा रक्कम देण्यास टाळाटाळ करणार्‍या एआयसी पीकविमा कंपनीविरोधात तत्काळ गुन्हे दाखल करा, जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही, तोपर्यंत येथून हटणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेत शेतकरी नेते विनायक सरनाईक, डॉ. ज्ञानेश्वर टाले व डॉ. ऋतुजा चव्हाण यांनी साखरखेर्डा पोलिस ठाण्यावर हल्लाबोल केला आहे. सरकारने शेतकर्‍यांना तत्काळ पीकविमा रक्कम द्यावी, अन्यथा आम्ही शेतकर्‍यांना घेऊन रस्त्यावर उतरू, असा खणखणीत इशारा यावेळी शेतकरी नेत्या डॉ. ऋतुजा चव्हाण यांनी दिला. सरकारने पीकविमा कंपनीचे पैसे दिले नाहीत, म्हणून कंपनी शेतकर्‍यांना त्यांचे हक्काचे पैसे देत नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

शेतकरी नेते डॉ. ज्ञानेश्वर टाले, विनायक सरनाईक, ऋषांक चव्हाण, डॉ. ऋतुजा चव्हाण यांच्यासह हजारो शेतकर्‍यांनी आज साखरखेर्डा पोलिस ठाण्यावर धडक दिली. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने शेतकर्‍यांची दिशाभूल चालवली असून, अजूनही बहुतांश शेतकर्‍यांना पीकविम्याची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे नियमाप्रमाणे एआयसी या पीकविमा कंपनीविरोधात गुन्हे दाखल करा, अशी मागणी या शेतकरी नेत्यांनी केली. जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही व शेतकर्‍यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत पोलिस ठाण्यातून हलणार नाही, अशी भूमिका शेतकरी व शेतकरी नेत्यांनी घेतल्यानंतर पोलिस ठाण्यात चांगलाच तणाव निर्माण झाला होता.शेतकरी नेत्या डॉ. ऋतुजा चव्हाण या चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या. येथील लोकप्रतिनिधी शेतकर्‍यांची दिशाभूल करत आहे, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार शेतकर्‍यांना वेड्यात काढत आहे. सरकारने आमचे पैसे दिले नाहीत, म्हणून आम्ही शेतकर्‍यांना विम्याची रक्कम देऊ शकत नाही, असे पीकविमा कंपनी सांगत आहे. तर या कंपनीच्या विमा रकमेच्या वाटपातही मोठाच घोळ आहे. त्यामुळे सरकारने आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शेतकर्‍यांना पीकविम्याची रक्कम द्यावी, अन्यथा शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरू, अशा इशारा डॉ. ऋतुजा चव्हाण यांनी यावेळी दिला.स्थानिक पोलिस अधिकार्‍यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, आंदोलक व शेतकरी हे चांगलेच आक्रमक झालेले होते. यावेळी डॉ. ज्ञानेश्वर टाले, डॉ. ऋतुजा चव्हाण, ऋषांक चव्हाण, विनायक सरनाईक व शेतकर्‍यांनी पीकविमा कंपनीविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली. या आंदोलनामुळे एकच तणाव निर्माण झालेला असून, पोलिसांनी बंदोबस्त वाढवलेला होता. तसेच, मेहकर व लोणार तालुक्यांतून मोठ्या प्रमाणात शेतकरी साखरखेर्डा पोलिस ठाण्याकडे येण्यास सुरूवात झाल्याने हे आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!