आ. श्वेताताई महालेंचे प्रयत्न यशस्वी; भक्तीमहामार्ग अखेर रद्द!
- राज्य सरकारकडून अधिसूचना काढून सिंदखेडराजा-शेगाव भक्तीमहामार्ग रद्दची घोषणा
– आ. श्वेताताई महाले यांचा शेतकर्यांना दिलासा; शेतकर्यांनी मानले आभार!
– काही स्थानिक नेत्यांकडून आता श्रेय लाटण्याचा प्रयत्न!
चिखली (तालुका प्रतिनिधी) – चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी मातृतीर्थ सिंदखेडराजा ते शेगाव या भक्ती महामार्गात आपल्या सुपीक व कसदार जमिनी जाणार्या शेतकर्यांना हा महामार्ग रद्द करण्याचा शब्द दिला होता. तो शब्द खरा करण्यासाठी त्यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकडे जोरदार प्रयत्न केले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उच्चस्तरीय बैठकीतही त्यांनी ही मागणी रेटून धरली होती. त्यानुसार, अखेर शेतकर्यांना नकोसा असलेला भक्तीमहामार्ग राज्य सरकारने अधिसूचना काढून रद्द केला असून, तसे राजपत्रही प्रसिद्ध झाले आहे. त्याबद्दल चिखली, सिंदखेडराजा, देऊळगावराजासह भूसंपादनात जमिनी जाणार्या सर्वच शेतकर्यांनी श्वेताताईंचे आभार व्यक्त केले आहेत. दुसरीकडे, या महामार्ग रद्दचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न काही स्थानिक नेत्यांना चालविला असल्याचे दिसून आल्यानंतर शेतकर्यांतून संताप व्यक्त केला जात होता.
सिंदखेडराजा ते शेगाव हा प्रस्तावित १०९ किलोमीटरचा भक्तिमार्ग राज्य शासनाने अखेर रद्द केला आहे. मातृतीर्थ सिंदखेडराजा, देऊळगावराजा, मेहकर, चिखली आणि खामगाव या तालुक्यांमधून जाणार्या या मार्गाबद्दल शेतकर्यांमध्ये नाराजीची भावना होती. हा मार्ग झाल्यास सुपीक जमीन मोठ्या प्रमाणावर शेतकर्यांना गमावावी लागणार होती. त्यामुळे या मार्गाला विरोध सुरू झाला होता. या लोकभावनेची दखल घेऊन आ. श्वेताताई महाले यांनी राज्य शासनाकडे हा मार्ग रद्द करावा, यासाठी जोरदार पाठपुरावा केला. विधानसभेच्या अधिवेशनात प्रश्न मांडून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र सादर करून त्यांनी आपली मागणी लावून धरली होती. अखेर आ. महाले यांच्या पाठपुराव्याला यश आले असून, राज्य शासनाने भक्ती मार्ग रद्द करण्याचा निर्णय घेतला व या संदर्भातला शासन आदेश काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काढण्यात आला. तसेच, अधिसूचनाही प्रसिद्ध झाली आहे.
राजमाता जिजाऊ मॉसाहेबांचे जन्मस्थान असलेले सिंदखेडराजा व संतश्रेष्ठ गजानन महाराजांचे समाधीस्थळ असलेल्या शेगाव या दोन पर्यटनस्थळांना जोडणारा तसेच समृद्धी महामार्गाला संलग्न असणारा १०९ किलोमीटर लांबीचा हा संकल्पित भक्तिमार्ग त्याच्या घोषणेपासूनच वादात अडकला होता. या भक्ती महामार्गामध्ये आपली सुपीक जमीन जाणार असल्याने शेतकर्यांकडून या मार्गाला विरोध सुरू झाला होता. चिखली मतदारसंघातदेखील अनेक शेतकर्यांनी हा मार्ग रद्द करावा, अशी मागणी आ. श्वेताताई महाले यांच्याकडे केली होती. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पळसखेड दौलत येथे शेतकर्यांच्या शिष्टमंडळाशी बोलताना आ. श्वेताताई महाले यांनी सदर भक्ती मार्ग रद्द करण्याचे ग्वाही दिली होती. याशिवाय, वेळोवेळी त्यांनी जाहीरपणे या महामार्गाच्या बद्दल आपली भूमिका स्पष्ट केली होती.
आ. महालेंनी केला पाठपुरावा!
भक्ती महामार्ग रद्द व्हावा, ही शेतकर्यांची जनभावना लक्षात घेऊन आ. श्वेताताई महाले यांनी राज्य शासनाकडे याबद्दल पाठपुरावा केला. विधानसभेत प्रश्न उपस्थित करून तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे जिल्ह्यातील शेतकर्यांची या मार्गाबद्दलची तीव्र भावना त्यांनी पोहोचवली होती. आ. महाले यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून, राज्य शासनाने भक्ती मार्ग रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. काल दि.१४ ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबद्दलचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
———–