Breaking newsHead linesMaharashtraMetro CityMumbaiPolitics

राज्यसभा निवडणुकीतून अजितदादा-फडणवीस यांच्यातील “पहाटेची दोस्ती” उघड?

– राज्यसभा बिनविरोध करण्याची परंपरा यंदा पहिल्यांदाच खंडित!

पुरुषोत्तम सांगळे

राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याची गेल्या २४ वर्षांची महाराष्ट्राची परंपरा यंदा प्रथमच खंडित झाली. भाजप व महाविकास आघाडीकडे असलेली अतिरिक्तची मते लक्षात घेता, या दोघांनीही सहावा उमेदवार दिला. आणि, नाही म्हटले तरी राजकीय घोडेबाजार झाला असावा, आणि महाविकास आघाडीची १० मते फुटून भाजपचा उमेदवार विजयी झाला. मते फुटल्याबाबत ज्या आमदारांवर शिवसेनेला संशय आहे, ते अजित पवार समर्थक आमदार आहेत, त्यामुळे अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील “पहाटेची दोस्ती” पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
मते फुटल्याचा आरोप शिवसेनेने ज्या आमदार संजयमामा शिंदे (करमाळा) व देवेंद्र भुयार (अमरावती) यांच्यावर केला, ते दोघेही अजित पवारांचे समर्थक आहेत. बहुजन विकास आघाडी, समाजवादी पक्ष आणि काही अपक्षांच्या मदतीने भाजप उमेदवाराने बाजी मारल्याचे प्रथमदर्शनी चित्र असले तरी, झाकली मूठ सव्वालाखाची असल्याने ही निवडणूक नेमकी कशी जिंकली, हे स्पष्ट करणे अवघड आहे. तरीही ‘पहाटेच्या शपथविधीची मजबूत दोस्तीच’ हा विजय देऊन गेला, असे राजकीय धुरिणांचे मत आहे.
छत्रपती संभाजीराजे यांना महाआघाडीने पाठिंबा द्यावा, या मताचे पवार काका-पुतणे होते. परंतु, शिवसेनेने संभाजीराजेंना पक्षप्रवेशाचीच अट घातल्याने संभाजीराजे हे महाआघाडी पुरस्कृत उमेदवार होऊ शकले नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मन मोठे केले असते तर आज कदाचित चित्र वेगळे असते. महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबळ असतानाही शिवसेना उमेदवार संजय पवार यांचा पराभव तर झालाच. परंतु, संजय राऊत हेदेखील काठावर पास झाले, ही बाब शिवसेनेसाठी निश्चितच धक्कादायक आहे. चर्चा होत आहे त्याप्रमाणे आजही अजितदादा आणि फडणवीस यांच्यात ‘दोस्तीचे संबंध’ असतील तर हे सरकार स्थिर नाही व ते कधीही कोसळू शकते, हे लक्षात घ्यावे लागणार आहे. भाजपच्या उमेदवारांना पडलेली मते पाहाता, राज्यातील ठाकरे सरकार अल्पमतात आहे का?, हा प्रश्न निर्माण होत आहे.

आकडे काय सांगतात?
राज्यसभा निवडणुकीत २८५ आमदारांनी मतदान केले. तर निवडणूक आयोगाने शिवसेना आमदार सुहास कांदे यांचे मत बाद ठरवले. भाजप आघाडीकडे ११२ मते होती. त्यात भाजपचे १०६, जनसुराज्य आणि मनसे प्रत्येकी १, आणि ४ अपक्ष यांचा समावेश होता. तरीही पीयूष गोयल, अनिल बोंडे यांना पहिल्या पसंतीची प्रत्येकी ४८ मते पडली तर धनंजय महाडिक यांना २६ मते पडली. म्हणजे, एकूण मते झाली १२२. भाजपला १० अतिरिक्त मते पडली, ही कुणाची आहेत?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!