पीकविमा कंपनीला सरकारने पैसे न दिल्यानेच शेतकर्यांचा पीकविमा रखडला; ऋषांक चव्हाण यांचा घणाघात!
- मेहकर, लोणारमधील शेतकर्यांचा पीकविमा न मिळाल्याने सरकारच्या विरोधात संतापाची लाट!
– पीकविम्याच्या हक्काच्या लढाईत सर्व शेतकर्यांनी सामिल व्हावे – डॉ. ज्ञानेश्वर टाले; मेहकर मतदारसंघात पीकविम्यासाठी वणवा पेटणार!
मेहकर (तालुका प्रतिनिधी) – मेहकर व लोणार तालुक्यांतील शेकडो शेतकर्यांचा पीकविमा रक्कम अद्याप मिळालेली नाही. याबाबत पीकविमा कंपनीकडे शेतकरी विचारणा करण्यास गेले असता, राज्य सरकारनेच आमचा हिस्सा दिला नाही, म्हणून पीकविमा जमा करता येत नाही, असे ही कंपनी सांगत आहे. एकीकडे सरकारकडे जाहिरातबाजी व इतर गोष्टीवर उधळपट्टीसाठी पैसे आहेत. पण, शेतकर्यांचा पीकविमा देण्यासाठी पैसे नाहीत, असा गंभीर आरोप शेतकरी नेते तथा सहकार क्षेत्रातील अग्रगण्य नेतृत्व ऋषांक चव्हाण यांनी केला आहे. मेहकर व लोणारमधील उर्वरित शेतकर्यांना तातडीने पीकविम्याची रक्कम द्या, अन्यथा राज्यातील एकनाथ शिंदे सरकारविरोधात वणवा पेटेल, असा गंभीर इशाराही ऋषांक चव्हाण यांनी दिला आहे. पीकविम्याच्या हक्काच्या लढाईत सर्व शेतकर्यांनी सामील व्हावे, असे आवाहन याप्रसंगी करत, मेहकर मतदारसंघात पीकविम्यासाठी वणवा पेटणार असल्याचेही शेतकरी नेते डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनीही ठणकावून सांगितले आहे.
सहकार तथा शेतकरी नेते ऋषांक चव्हाण, शेतकरी नेते डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्यासह शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या सहकार्यांच्यावतीने मेहकर तालुक्यातील बर्याच गावागावांमध्ये पीकविमासंदर्भात शेतकर्यांच्या बैठका आयोजित करून मार्गदर्शन करण्यात येत आहे. तसेच, रविकांत तुपकर यांच्या विविध आंदोलनाच्या माध्यमातून अखेर पीकविमा कंपनी व सरकारने पीकविम्याचे पैसे जमा करण्यास सुरूवात केली असली तरी, उर्वरित मेहकर व लोणार तालुक्यातील सन २०२३-२०२४ च्या खरीप व रब्बी पिकांचा बर्याच शेतकर्यांना पीकविमा मिळाला नसल्यामुळे उर्वरित शेतकर्यांना तात्काळ रब्बी सोयाबीन व खरिपाचा हरभरा, गहू रिजेक्टेड व एक्सेप्टेड सरसकट पीकविमा मिळावा, याकरिता वरूड, घाटबोरी, दुर्गबोरी या गावामधील शेतकर्यांकडून पीकविम्याचे फॉर्म भरून घेऊन पुढील कारवाई करण्याच्या दृष्टीने तसेच पीकविम्यासाठी शेतकर्यांची एकजूट करत, मोठी लढाई मेहकर व लोणार तालुक्यामध्ये उभी करण्याचा प्रयत्न हे शेतकरी नेते करत आहेत. या लढाईमध्ये शेतकर्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मेहकर व लोणार तालुक्यातील सगळ्या शेतकर्यांना पीकविमा मिळवून दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. यासाठी गावागावात शेतकर्यांचा वणवा पेटत असून, राज्य सरकार व पीकविमा कंपनीच्या विरोधात शेतकर्यांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाल्याचेही ऋषांक चव्हाण व ज्ञानेश्वर टाले यांनी सांगितले आहे.
मेहकर व लोणार तालुक्यांतील मोठ्या प्रमाणात शेतकरी हे पीकविमा रकमेपासून वंचित आहे. त्यासाठी गावोगावी शेतकरी नेते जनजागृती करत असून, शेतकर्यांची एकजूट करत आहेत. त्यामुळे शिंदे गटाचे आमदार डॉ. संजय रायमुलकर यांनी सोशल मीडियावर आक्रमक भूमिका घेत, या नेत्यांवर आगपाखड केल्याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी अतिशय काही अश्लाघ्य शब्द वापरल्याचेही दिसून येत असून, त्यामुळेदेखील शेतकरीवर्गात संतापाची लाट दिसून येऊ लागली आहे.
—————