पीकविमा वाटपातील तब्बल १४१.५७ कोटींची घोळच चिखलीत उघड!
- शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी घेतला पीकविमा कंपनीच्या कार्यालयाचा ताबा
– चिखलीत शेतकरी खवळले, अभूतपूर्व परिस्थिती निर्माण; संतप्त कार्यकर्त्यांकडून खुर्च्यांची फेकाफेक
– शासनाकडून प्राप्त खरिपाच्या रक्कमेचा आकडाच जुळत नसल्याने शेतकरी नेते हिशोबावर अडले! पोलिसांच्या मध्यस्थीने अखेर आंदोलन मागे
चिखली (तालुका प्रतिनिधी) – उर्वरित पीकविमा रकमेसाठी जिल्ह्यात शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी दिलेल्या कार्यालय फोडण्याचा इशार्यानंतर कार्यकर्त्यांनी आक्रमक होत वाशिम येथील पीकविमा कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. तर आता चिखलीतसुद्धा शेतकरी नेते विनायक सरनाईक व नितीन राजपूत यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, राज्य सरकारकडून खरिपासाठी मंजूर व आलेल्या रक्कमेचा १४१ कोटी ५७ लाख रूपयांचा हिशोबच जुळत नसल्याचा आरोप शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना केला आहे. पीकविमा कंपनी प्रतिनिधी सरनाईक यांच्या प्रश्नांच्या सरबत्तीमुळे अनुत्तरीत झाले असून, जोपर्यंत उर्वरित पीकविमा रक्कम मिळत नाही, खरिपाचा आकडा जुळत नाही, तोपर्यंत कार्यालय सोडणार नसल्याची भूमिका या शेतकरी नेत्यांनी घेतली होती. परंतु, पोलिसांच्या मध्यस्थीनंतर रात्री उशिरा हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. या आंदोलनामुळे चिखलीत अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली हाेती. संतप्त कार्यकर्त्यांनी यावेळी खुर्च्यांची फेकाफेक करून आपला संतप्त व्यक्त केला.
पीकविमा कंपनीकडून जिल्ह्यातील खरिपामध्ये नुकसान झालेल्या शेतकर्यांना नुकसानीपोटी एकूण प्रीमियम २८०.१८ कोटी ऐवढी रक्कम प्राप्त झाली होती. त्यापैकी १३८.५१ कोटी वाटप झाले असल्याचे विमा कंपनी प्रतिनिधी सांगत आहेत, तर अपात्र शेतकर्यांना रक्कम देण्यासाठी व उर्वरित शेतकर्यांना सोयाबीन व इतर खरिपाचा पीकविमा देण्यासाठी ११३.६१ कोटी रूपयांची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली आहे. परंतु, कंपनीचा हिशोब केला असता, तो जुळत नसल्याने आणि कंपनीकडे १४१ कोटी ५७ लाख रुपये शासनाला परत केले नसल्याचेसुद्धा समोर आले आहे. तर ही रक्कम गेली कुठे, असा सवाल सरनाईक, राजपूत यांनी उपस्थित केला असून, गेल्या तीन तासांपासून कुठलाही कृषी विभागाचा किंवा पीकविमा कंपनीचा प्रतिनिधी यावर उत्तर देऊ शकत नसल्याने जोपर्यंत या प्रकरणी चौकशी होवून उर्वरित शेतकर्यांच्या हक्काच्या रकमेचा हिशोब जुळत नाही, कंपनीकडे पैसे पडून असल्याचे दिसत असतांना खात्यावर रक्कम पडणार नाही, तोपर्यंत कार्यालय सोडणार नसल्याची भूमिका शेतकरी नेते विनायक सरनाईक यांच्या नेतृत्वात रविकांत तुपकर यांच्या समर्थकांनी घेतली आहे. तालुक्यातील शेतकरीसुद्धा पीकविमा कार्यालयात उपस्थित झाले असून, एकतर आमच्यावर गुन्हे दाखल करा, नाहीतर पीकविमा कंपनीवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी सरनाईक, राजपूत यांच्यासह शेतकर्यांनी केली आहे.
ही रक्कम नेमकी वाटप झाली कोठे?
या प्रकरणी शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी एूण प्रीमियम रक्कम, एकूण मंजूर नुकसान भरपाई रक्कम याबाबत विचारणा केली तर पीकविमा प्रतिनिधी यांनी २८० प्रीमियम पैकी २५२ मंजूर आहेत, असे सांगितले. असे असले तरी मंजूरपैकी १३८ कोटी वाटप बघता ११४ कोटींचा हिशोब जुळता जुळत नसल्याने पीकविमा प्रतिनिधी मात्र अनुत्तरीत झाले होते. या प्रश्नी जिल्हा प्रतिनिधी यांना सर्व रक्कमेचा हिशोब कागदावर सादर करावा, अशी मागणी कार्यकर्ते यांनी केली आहे. चिखली कार्यालयात शेतकर्यांना दाखविण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त आकडे जुळले नाही, हे विशेष.
पीकविमा कंपनीला सरकारने पैसे न दिल्यानेच शेतकर्यांचा पीकविमा रखडला; ऋषांक चव्हाण यांचा घणाघात!