‘बारामतीकर’च बिग बॉस!; सूरज चव्हाणने पाचवे पर्व जिंकले!
- सोशल मीडिया स्टार सूरज ठरला बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता
– भरघोस बक्षिसांसह चित्रपटाचीही मिळाली ऑफर!
मुंबई (तारा शिंदे) – बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वावर अखेर बारामतीकरानेच आपले नाव कोरले असून, आज बिग बॉस मराठी-५चा ग्रँड फिनाले पार पडला. सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाण हा यंदाच्या पर्वाचा विजेता ठरला आहे. बुक्कीत टेंगूळ देत सूरजने झापुक झुपूक स्टाइलने बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीवर नाव कोरले. बिग बॉस मराठीचे यंदाचे पर्व खर्याअर्थाने खास होते. होस्ट बदलण्यापासून ते स्पर्धकांपर्यंत खर्याअर्थाने प्रेक्षकांना सरप्राइजेस मिळाले. सूरजची निवडदेखील सरप्राईझ ठरली.
बारामतीचा असलेला सूरज चव्हाण सोशल मीडियावर चांगलाच प्रसिद्ध आहे. सूरजचे आयुष्य हे अत्यंत खडतर गेले आहे. लहान असतानाच त्याच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला. त्यात घराची परिस्थितीदेखील बिकट असल्याने त्याने केवळ आठवीपर्यंतचे शिक्षण घेतले. सूरजला पाच बहिणी असून, त्याच्या मोठ्या बहिणीने सूरजचा सांभाळ केला आहे. बुक्कीत टेंगूळ, गुलीगत धोका अशा त्याच्या शब्दांमुळे आणि रिल्समुळे सूरज चांगलाच फेमसदेखील झाला. सूरज चव्हाण याला बिग बॉस मराठीतील विजयामुळे १४ लाख ६० हजार रुपये मिळाले. तसेच पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सकडून दहा लाख रुपये मिळाले. त्यासोबतच त्याला एक स्कूटर मिळाली. एका चित्रपटाची ऑफरसुद्धा सूरजला मिळाली. प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्याला चित्रपटाची ऑफर दिली आहे. सूरज आगामी काळात आपल्याला झापुकझुपुक या चित्रपटात दिसणार आहे. बिग बॉसच्या सिजनमध्ये गेस्ट म्हणून आलेले असतांना उत्कर्ष शिंदे यांनीही सूरजला एक गिफ्ट दिले होते. त्यावेळी उत्कर्ष शिंदे म्हणाले की, सूरजसोबत शिंदेशाही म्हणजेत शिंदे कुटुंबीय एक गाणे बनवणार आहेत.
सूरज चव्हाण, अभिजीत सावंत आणि निक्की तांबोळी यांनी टॉप तीनमध्ये स्थान मिळवले होते. सूरजने सर्वांधिक व्होट मिळवत ट्रॉफीवर नाव कोरले. अभिजीत फर्स्ट रनर अप ठरला तर निक्की तांबोळीला तिसरे स्थान मिळाले. धनंजय पोवार चौथ्या तर अंकिता वालावलकर पाचव्या स्थानावर राहिली. ९ लाख रुपयांची बॅग घेऊन जान्हवी किल्लेकरने सहाव्या क्रमांकावर राहणे पसंत केले. ‘बिग बॉस मराठी’च्या महाअंतिम सोहळ्याला रितेश देशमुखने ‘चार चाँद’ लावले. आपल्या धमाकेदार सादरीकरणाने त्यांनी ‘बिग बॉस मराठी’च्या भव्यदिव्य महाअंतिम सोहळ्याचा मंच दणाणून सोडला. आपल्या हटके स्टाईलने त्यांनी महाअंतिम सोहळ्याची शोभा वाढवली.