LONARMEHAKARVidharbha

शाळांत सीसीटीव्ही लावा, संशयितांची तातडीने माहिती द्या, गोपनीय तक्रारपेटी लावा!

- बिबीच्या ठाणेदारांनी मुलींच्या सुरक्षितेसंबंधी घेतली शाळांचे प्राचार्य, मुख्याध्यापकांची बैठक

बिबी (ऋषी दंदाले) – महाराष्ट्रात वाढत चाललेल्या गुन्हेगारी व छेडछाडीच्या प्रकारांवर गांभीर्याने लक्ष देत, बिबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील यांनी बिबी पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या शाळा, महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, मुख्याध्यापकांना बोलावून बैठक घेण्यात आली. तसेच, त्यांना मुलींच्या सुरक्षितेबाबत महत्वपूर्ण सूचना केल्यात.

या बैठकीमध्ये विद्यार्थ्यांची घ्यावयाची खबरदारी याबाबत योग्य सूचना देण्यात आल्यात. शाळेत विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना गोपनीय तक्रार करता यावी, याकरता शाळेत तक्रार पेटी ठेवावी, पोलीस मदतीकरिता ११२ नंबर वर संपर्क करावा, मुला-मुलींकरता वेगवेगळ्या स्वतंत्र व बंदिस्त वॉशसरूमची व्यवस्था करावी, शाळा, महाविद्यालय परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, शाळेत शाळेच्या विद्यार्थी व्यतिरिक्त इतर व्यक्ती आल्यास त्यांची चौकशी करावी, संशयित वाटल्यास तात्काळ पोलीस ठाण्यात माहिती द्यावी, पालक किंवा नातेवाईक म्हणूनही अनोळखी व्यक्ती कोणी आल्यास आपल्या शाळेच्या रेकॉर्डवरून विद्यार्थी किंवा आई वडील यांच्याकडून संबंधित व्यक्तीची खात्री करावी, तसेच शाळेतील बाहेरगावची विद्यार्थ्यांना ने आण करणारे चालक तसेच गाड्यांमधील इतर कर्मचारी तसेच शाळेतील सफाई कर्मचारी यांचे चारित्र्य पडताळणी अहवाल बनवून घेण्याबाबत सूचना दिल्या. शाळेतील असुरक्षित जागेवरदेखील सीसीटीव्ही बसवणे, विद्यार्थिनीकरिता महिला कौन्सिलर नेमणे अशा बाबींची माहिती मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक यांना येणार्‍या अडचणी समजून सांगण्यात आल्या व त्यांना बाहेरील व्यक्ती शाळेत येऊन विनाकारण त्रास देत असेल, दारू पिऊन शाळेत येत गोंधळ घालत असेल तर त्याचीही माहिती दिल्यास त्या उपद्रवी लोकांवरदेखील कारवाई करण्यात येईल, असा विश्वास देण्यात आला. यावेळी परिसरातील प्राचार्य, मुख्याध्यापक ,शिक्षक उपस्थित होते.
——————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!