भोगवती नदीत पाणी सोडण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार!
- माजी मंत्री आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांची ग्वाही; पाऊस होऊनही धरणे न भरल्याने परिसरातील चिंतेची घेतली दखल!
– साखरखेर्डा ग्रामपंचायतीच्या तीन घंटा गाड्यांचे केले लोकार्पण
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – साखरखेर्डा भागात पिकांना पुरक पाऊस झाला, पण तलाव, धरणे भरली नाहीत. त्यामुळे खडकपूर्णा प्रकल्पातून लिफ्टद्वारे भोगवती नदीत पाणी सोडण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन माजी मंत्री तथा आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले. तसेच, बांधकाम मजुरांना साहित्य वाटप होत असताना काही ग्रामसेवक हे पैसे उकळत असल्याची तक्रार आल्याने, अशा ग्रामसेवकांची तक्रार थेट माझ्याकडे करा, त्यांना मी पाहून घेतो, असा दमच त्यांनी संबंधित लाचखोर ग्रामसेवकांना भरला.
साखरखेर्डा येथे ग्रामपंचायतीने घेतलेल्या तीन घंटा गाड्यांचे लोकार्पण आ. शिंगणे यांच्याहस्ते पार पडले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते म्हणाले, की वाढता डेंग्यु मच्छरांचा प्रादूर्भाव पाहता, गावात स्वच्छता अभियान राबविणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांनी स्वच्छता अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. या अगोदर ग्रामपंचायतीकडे एकच घंटागाडी होती. त्यामुळे येवढ्या मोठ्या गावातील घनकचरा व्यवस्थापन करताना अडचणी येत होत्या. ग्रामपंचायत सरपंचा सौ.सुमनताई जगताप यांनी नागरिकांची समस्या लक्षात घेऊन तीन नवीन घंटागाडी खरेदी केल्या. दि. ५ ऑक्टोबररोजी माजी मंत्री तथा आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी तीनही वाहनांचे पूजन करुन लोकार्पण केले. यावेळी माजी उपाध्यक्ष राम जाधव, सरपंच सौ.सुमनताई जगताप, उपसरपंच सय्यद रफीक, सुनील जगताप, ग्रामपंचायत सदस्य संग्रामसिंह राजपूत, संतोष मंडळक, ईब्राहिम शहा, शुभम राजपूत, दत्ता घोडके, ललित अग्रवाल, आदित्य काटे, अनिल जगताप आदी उपस्थित होते. यावेळी साखरखेर्डा गावातील सर्व नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत असून, डॉ.राजेंद्र शिंगणे आणि सौ. रजनीताई शिंगणे यांनी प्रत्येक जगदंबा देवी मंडळात जाऊन पूजन केले. प्रत्येक ठिकाणी भेट दिल्याने महिलांनी दोघांचेही स्वागत केले.
यावेळी भोगावती नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी पत्रकार यांनी केली असता, डॉ.राजेंद्र शिंगणे म्हणाले की, साखरखेर्डा भागात पिकाला पुरक असा पाऊस झाला. परंतु, नदी नाले ओढे खळखळ वाहिली नाही. त्यामुळे तलाव, धरणे भरली नाहीत. याची दखल घेऊन खडकपूर्णा नदीपात्रातून जे पाणी वाहात आहे ते पाणी लिप्ट कालव्यातून भोगावती नदी पात्रात सोडण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून आणि लेखीपत्र देऊन पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी साखरखेर्डा भागातील बांधकाम व्यावसायिक, मजूर यांच्याकडून साहित्य वाटप करताना दोन ते तीन हजार रुपये वसूल करण्यात येतात. अनेक ग्रामसेवक अर्जावर सह्या करीत नाही. ही समस्या आदित्य काटे आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी मांडली. यावर संबंधित अधिकार्यांना फोन लावून सक्त ताकीद माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी दिली. यानंतर कोणी पैसे मागितले तर सरळ माझ्याकडे तंक्रार करा, मी बघतो, असे आश्वासन त्यांनी दिले.