संभाजी ब्रिगेडने शिवसेनेकडे मागितल्या २५ जागा!
- केंद्रीय कार्यकारिणीची रविवारी सिंदखेडराजात बैठक
– विधानसभा निवडणुकीची रणनीती निश्चित करणार!
सिंदखेडराजा (अनिल दराडे) – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडच्या केंद्रीय कार्यकारणीची तातडीची बैठक जिजाऊ सृष्टी, सिंदखेडराजा येथे दिनांक ६ ऑक्टोबर, रविवाररोजी सकाळी ११ वाजता संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अॅड. मनोज आखरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीवर चर्चा होणार असून, संभाजी ब्रिगेडची शिवसेना (ठाकरे) पक्षासोबत युती आहे. त्यादृष्टीकोनातून संभाजी ब्रिगेडने महाआघाडीकडे शिवसेनेच्या कोट्यातून २५ जागांची मागणी केली असून, त्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सन्मानजनक जागा देण्याचा शब्द दिला आहे. यासह विविध राजकीय रणनीतीवर या बैठकीत चर्चा व निर्णय होणार असल्याचे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी सांगितले आहे.
रविवारी आयोजित या बैठकीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात होणार असून, संभाजी ब्रिगेडची शिवसेना ठाकरे गटासोबत युती असल्याने जागावाटपासंदर्भात शिवसेनेसोबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. शिवसेनेकडे अर्थात महाविकास आघाडीच्या कोट्यातील २५ जागांची मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. त्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सन्मानजनक जागा दिल्या जातील, असा शब्द दिला आहे. त्या २५ जागेची यादी शिवसेना ठाकरे गटाकडे संभाजी ब्रिगेडने पाठवली असून, सन्मानजनक जागा मिळतील, अशी संभाजी ब्रिगेडला अपेक्षा आहे. त्या संदर्भात नियोजन करण्यासाठी किंवा सन्मानजनक जागा मिळाल्या नाहीत तर काही वेगळा विचारसुद्धा संभाजी ब्रिगेड करू शकते, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यावरही विचारविनिमय या बैठकीत होणार आहे. संपूर्ण राज्यभर निवडणुकीची रणनीती काय असावी, यावरही चर्चा या बैठकीत होणार आहे. या बैठकीला संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अॅड मनोज आखरे, महासचिव सौरभ खेडेकर, मुख्य प्रवक्ते प्रा.गंगाधर बनबरे, डॉ.शिवानंद भानुसे, कार्याध्यक्ष सुधीर देशमुख, गजानन पारधी, कोषाध्यक्ष संतोष गाजरे यांच्यासह संपूर्ण केंद्रीय कार्यकारिणी, विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, महानगरअध्यक्ष यांची उपस्थिती राहणार असल्याचे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी कळविले आहे.