वाल्याचा वाल्मिकी बनविण्याची ताकद वारकरी संप्रदायात – हभप.संजय महाराज पाचपोर
- संजय महाराज पाचपोरांनी आता अयोध्या न्यासचे ट्रस्टी व्हावे - हभप. सखाराम महाराज पाचपोर
– ‘श्री ज्ञानोबा – तुकाराम पुरस्कार’ मिळाल्याबद्दल हभप.संजय महाराज पाचपोर यांचा सत्कार
बुलढाणा/देऊळगाव साखरशा (जिल्हा प्रतिनिधी) – राज्यातील विशेषतः पूर्व विदर्भात काम करत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. परंतु, सातत्य व निस्वार्थ, निष्काम भावना ठेवल्यावर यश मिळतेच. त्याचाच प्रत्यय म्हणून या भागातील काही नक्षलवादी तरूणांची मुलेही आता बालसंस्कार शिबिराच्या माध्यमातून धार्मिकतेचे धडे गिरवत आहेत. एकंदरीत प्रयत्न केल्यास वाल्याचादेखील वाल्मिकी होतो, असे प्रतिपादन विदर्भरत्न, रामायणाचार्य हभप. संजय महाराज पाचपोर यांनी केले, तर सत्कारासोबत सत्कार्यही करणे गरजेचे आहे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. तर संजय महाराज पाचपोर यांचे सर्वदूर व निष्कलंक काम पाहता त्यांना आता अयोध्या राम मंदिराचे ट्रस्टी म्हणून पाहायला आवडेल, अशी अपेक्षा हभप .कूलभूषण सखाराम महाराज पाचपोर (ईलोरा) यांनी व्यक्त केली.
राज्य शासनाचा आध्यात्मिक क्षेत्रातील सर्वोच्च असा श्री ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार हभप. संजय महाराज पाचपोर यांना नुकताच मिळाला. त्याबद्दल देऊळगाव साखरशासह नायगाव देशमुख, शिर्ला नेमाने, आडगाव आदी पंचक्रोशीतील पाचपोर पाटील समाज बांधवांच्यावतीने त्यांचा सत्कार मेहकर तालुक्यातील देऊळगाव साखरशा येथील नारायणपुरी महाराज संस्थान येथे आज (दि.५) आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हभप. सखाराम महाराज पाचपोर सखाराम महाराज संस्थान (ईलोरा) होते. यावेळी विठ्ठल-रुक्मिणी संस्थान पंढरपूरचे विश्वस्त हभप. प्रकाश महाराज जवंजाळ, हभप. गोपाळ महाराज उरळकर, हभप. योगेश महाराज पाचपोर आदींची उपस्थिती होती. आपण कोणत्याही गोसेवा संस्थेचे ट्रस्टी नसतानाही जवळजवळ १८ हजार गाईंचे संगोपन करतो, असेही यावेळी संजय महाराज पाचपोर म्हणाले. गोमातेला राज्यमातेचा दर्जा हभप.संजय महाराज पाचपोर यांच्यामुळेच मिळाला, असे यावेळी आपल्या भाषणातून हभप. प्रकाश महाराज जंजाळ यांनी सांगितले.
यावेळी हभप. सखाराम महाराज पाचपोर यांच्याहस्ते ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार मिळाल्याबद्दल हभप. संजय महाराज पाचपोर यांचा सत्कार करण्यात आला. पंचक्रोशीतील समाज बांधव, पत्रकार बांधव, विविध भजनी मंडळे तसेच गावकर्यांनीही हभप. संजय महाराज पाचपोर यांचा यावेळी हृदय सत्कार केला. प्रास्ताविक संतोष पाचपोर यांनी केले. कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण तितकेच बहारदार संचलन अनिल पाचपोर यांनी केले. यशस्वीतेसाठी समाजबांधव, युवक मंडळ आदिंनी परिश्रम घेतले. यावेळी पंचक्रोशीतील समाज बांधव यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.