BULDHANAVidharbha

‘दिशा’ने स्पष्ट केली राजकारणाचीही ‘दिशा’!

- जयश्रीताई शेळके ठरल्या महिलांसाठी हक्काची 'लाडकी बहीण'

बुलढाणा (गणेश निकम केळवदकर) – बुलढाणा येथे दिशा बचत गट फेडरेशनची भव्य प्रदर्शनी सुरू आहे. ही प्रदर्शनी महिलांसाठी हक्काची बाजारपेठ ठरली आहे. कुठलीही शासकीय यंत्रणा पाठीशी नसताना मेळाव्यासाठी उपस्थित झालेल्या हजारो माता-भगिनी, त्यांच्या वस्तूंना मिळालेली बाजारपेठ, झालेली कोट्यवधी रुपयांची उलाढाल आणि उपस्थित सर्वांचे प्रेम पाहता, जयश्रीताई शेळके या महिलांच्या हक्काची ‘लाडकी बहीण’ ठरल्या आहेत. सद्या निवडणुकीच्या काळामध्ये लाडकी बहीण योजना गाजत आहे. ही योजना आणून सरकारने महिलांना पंधराशे रुपये दिले आहेत. महिलांना (म्हणजे मतदारांना) आकर्षित करण्याचे काम राजकारण्यांकडून सुरू आहे.

बुलढाण्यात यापूर्वी महिलांचा भव्य मेळावा झाला असताना, कालचा मेळावा राजकारणाची पायाभरणी असवा, असे वाटत असेल तरी वास्तव मात्र तसे दिसत नाही. गेल्या १० वर्षांची त्याला परंपरा आहे. मागीलवर्षी याच वेळेला डीएड कॉलेजच्या प्रांगणात हा मेळावा झाला होता, हे विशेष. यंदा शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांची उपस्थिती लाभली. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस अशा मोठ्या पक्षाच्या मोठ्या महिला नेत्या आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

लाडकी बहिण नव्हे लाडकी मतदार योजना

महिलांना सरकारकडून पंधराशे रुपये मिळत आहे. बचतगट प्रदर्शनीच्या उद्घाटन सत्रात याचा उल्लेख सुषमा अंधारे यांनी, पंधरा टिकल्या असा करून ही योजना लाडकी बहीण नसून ‘लाडकी मतदार’ योजना असल्याचा घणाघात केला. सुषमाताई ह्या तडाखेबंद भाषणासाठी परिचित आहेत. बुलढाण्यात त्यांनी या योजनेची पुरती पोलखोल केली. मुख्यमंत्री काय घरून देत नाही, काही फडणवीसांनी बंगला विकला नाही… आपलेच पैसे आहे. आपल्या हक्काचे आहे, ते घ्या पण राज्यात बहिणी सुरक्षीत आहेत का? लोकसभेत दणका बसला म्हणून बहीण (खरे तर मतदार) आठवल्याचा घणाघात त्यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणीताई खडसे यांच्या उपस्थितीत या मेळाव्याचे दणक्यात उद्घाटन झाले. काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुलढाणा येथे आले होते. यावेळी शासनाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात महिलांची मोठी उपस्थिती लाभली. प्रशासनाने प्रयत्न करून आणलेल्या महिला.. यासाठी अधिकारी दिमतीला आणि शासन प्रशासनाशी कुठलाही संबंध नसताना केवळ ‘जयश्रीताई शेळके’ या वलयाभोवती उपस्थित झालेल्या महिला, यातील मोठा फरकही दिसून आला. शिगोसांग वाहिलेला हा मेळावा सध्या चर्चेचा विषय झाला आहे.

अनेक हात होते ‘बॅकस्टेज’

जयश्रीताई शेळके यांच्या प्रत्येक उपक्रमामध्ये बॅकस्टेजची भूमिका निभावताना अनेक हात दिसतात. आजच्या कार्यक्रमातही असे अनेक हा कार्यरत असल्याचे दिसून आले. नीटनेटके आयोजन, भव्यसभा मंडप, बचत गटांचे शेकडो स्टॉल, कृषीच्या विविध योजनांची माहिती, खाद्यजत्रा अशी विविधअंगी पर्वणी ठरला दिशा बचत गटाचा मेळावा. प्रदर्शनीच्या दुसर्‍या दिवशी सर्वच स्टॉलवर उस्फुर्त गर्दी दिसून आली. सकाळी आठ वाजेपासून खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर एकच गर्दी झाली होती. पहिला दिवस हा उदघाटनाचा व राजकीय नेत्यांच्या मांदियाळीचा असल्याने गर्दी अपेक्षितच होती. मात्र दुसर्‍या दिवशी गर्दी ओसरेल असे वाटत असताना दुसरा दिवसही हाउसफुल ठरला. एकूणच बुलढाणा विधानसभा मतदार संघाच्या राजकारणाची दिशा बदलणारा उत्सव ठरला ..दिशा बचत गट फेडरेशनचा बचतगट मेळावा.


जयश्रीताईंनी स्पष्ट केली आगामी ‘दिशा’!

एखाद्या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करताना विचार करावा लागतो. लोकं जमविणे हेच सद्या अवघड काम झालं आहे. त्यात भव्य व देखणे आयोजन करून महिलांना आकर्षित करणे हे अवघड काम त्या सहज करून गेल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर अनेक कार्यक्रम होतात. मात्र गेल्या आठ ते दहा वर्षांपासून सातत्याने महिलांना हक्काचे बाजारपेठ देण्याचे काम जयश्रीताई शेळके करीत आहे. त्यामुळे झालेला मेळावा हा बचत गटांचाच मेळावा म्हणावा लागतो. या मेळाव्यात बोलताना त्यांनी मात्र आगामी दिशा स्पष्ट केली आहे. जयश्रीताई शेळके या काँग्रेस पक्षाकडून विधानसभेसाठी इच्छुक आहेत. एखाद्यावेळी पक्षाकडून तिकीट न मिळाल्यास त्यांची तयारी महाविकास आघाडी अशीहीदेखील असू शकते. सुषमा अंधारे, रोहिणीताई खडसे यासारख्या बड्या नेत्यांना बोलावणे हा अप्रत्यक्ष संदेशच आहे. मेळाव्यातून त्यांनी लढणार.. असा आशावादही व्यक्त केला.

https://x.com/i/status/1842484813317750877

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!