Breaking newsHead linesPachhim MaharashtraPolitical NewsPoliticsWorld update

देशाच्या संविधानात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार : खा. राहुल गांधी

- छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराज नसते तर देशाचे संविधान नसते!

– राहुल गांधींच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी) – छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या थोर महापुरुषांचे फक्त पुतळे उभारून चालत नाही तर त्यांच्या आचारविचारांचे पालन करावे लागते. शिवाजी महाराज हे ज्या कार्यासाठी लढले, जगले, त्यातील थोडे तरी आपण आत्मसात केले पाहिजे. शिवाजी महाराजांनी सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन महान कार्य केले व अन्यायाविरुद्ध लढा दिला. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचारच देशाच्या संविधानात आहेत, असे सांगून छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराज नसते तर हे संविधान नसते, असे प्रतिपादन लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले.

कोल्हापुरातील कसबा बावडा भागात राहुल गांधींच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, देशात दोन विचारधारा आहेत, एक विचार धारा देश जोडणारी, सर्वांना सोबत घेऊन काम करणारी तर दुसरी विचारधारा संविधान संपवणारी आहे. ही विचारधारा लोकांना घाबरवते, ह्या विचारधारेचे लोक शिवाजी महाराजांना नमस्कार करतात, पण त्यांच्या विचारांचे पालन करत नाहीत. याच विचारधारेने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला नाही. त्यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा बनवला पण तो काही दिवसातच कोसळला. ही राजकीय लढाई नाही तर विचाराची लढाई आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

सत्तेत आल्यास आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटविणार!

दरम्यान, मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी राहुल गांधी यांनी महत्वपूर्ण तोडगा सूचविला. ते म्हणाले, आम्ही सत्तेत आलोत तर आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटविणार असून, जातीनिहाय जनगणना करणार आहोत. तसेच, सोशिओ इकॉनॉमिक सर्व्हेदेखील आम्ही करणार आहोत. आम्ही फक्त बोलत नाही जे बोलतो तो करून दाखवतो, असेही राहुल गांधी यांनी ठासून सांगितले. आरक्षणाची मर्यादा वाढविली तर मराठासह इतर समाजाच्याही आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागतो, परंतु केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार हे आरक्षणाची मर्यादा वाढविण्यास तयार नाही. परिणामी, राज्या राज्यांत संघर्ष सुरू आहे, याकडे आपल्या भाषणातून राहुल गांधी यांनी लक्ष वेधले.

लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी कोल्हापूरच्या उचगाव येथे टेम्पोचालक अजित तुकाराम संधे यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी व त्यांच्या कुटुंबीयांशी चर्चा केली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर महाराजांना अभिवादन केले. यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, शिवाजी महाराज जुलमी, अत्याचारी राजवटी विरोधात लढले. चंद्र, सूर्य असेपर्यंत राजेंचे नाव कायम राहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. शेतकर्‍यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका, अशी त्यांची शिकवण होती, परस्त्रीला मातेसमान मानणारा हा राजा होता. अशा या महान दैवताचा राजकोट येथील पुतळा कोसळल्याने ज्या वेदना झाल्या तो महाराष्ट्र व शिवप्रेमी जनता कधीही विसरणार नाही. कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पूर्णाकृती पुतळा आपल्या सर्वांना प्रेरणा देत राहिल. खासदार शाहू महाराज म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा समतेचा विचार आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. शिवाजी महाराजांच्या सैन्यात सर्व जाती धर्माचे लोक होते, तेंव्हापासूनच धर्मनिरपेक्षतेची सुरुवात झाली आहे.
विधान परिषदेतील गटनेते व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे संकल्पक आ.सतेज पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी या पुतळ्याच्या संकल्पनेची व रचनेची माहिती दिली. खा. राहुल गांधी यांच्या मनातील राज्य महाराष्ट्रात आणू असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला व नवरात्र महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे संकल्पक विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील असून, शिल्पकार सचिन घारगे, पाचगाव तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर आहेत. या कार्यक्रमाला प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, खासदार छत्रपती शाहू महाराज, विधान परिषद गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील, खासदार चंद्रकांत हंडोरे, प्रणिती शिंदे, रजनी पाटील, काँग्रे कार्यसमितीचे सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, कुणाल चौधरी, काझी निजामुद्दीन, बी.वी. व्यंकटेश, आ. भाई जगताप, युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत, एनएसयुआयचे आमीर शेख, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!