बुलढाणा विधानसभेसाठी विजयराज शिंदेंही मैदानात उतरणार?
- बुलढाणा विधानसभेची जागा भाजपला मागणार - जिल्हाध्यक्ष गणेश मांटे
– जिल्ह्यात भाजप राबविणार महासंपर्क अभियान!
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली असून, जिल्ह्यातील सर्व मतदारसंघात महासंपर्क अभियान राबवले जाणार असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मांटे यांनी सांगितले. दरम्यान, बुलढाणा विधानसभेची जागा आम्ही पक्षाकडे मागितली असल्याचे सांगून, त्यांनी सूचक विधान केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजपचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार विजयराज शिंदे हे या मतदारसंघातून मैदानात उतरणार असल्याची चर्चा आता रंगली असून, महायुतीत जागावाटपावरून मिठाचा खडा पडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
भाजपचे जिल्हा संपर्कप्रमुख विजयराज शिंदे, जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मांटे यांच्यासह भाजपच्या नेत्यांची पत्रकार परिषद बुलढाण्यात पार पडली. या बैठकीत बोलताना गणेश मांटे म्हणाले, की घाटावरील चार विधानसभा मतदारसंघात महासंपर्क अभियान राबवले जाणार आहे. या महासंपर्क अभियाने नेतृत्व चिखलीत आ. श्वेताताई महाले, बुलढाण्यात योगेंद्र गोडे व विजयराज शिंदे, सिंदखेडराजात गणेश मांटे, तोताराम कायंदे, विनोद वाघ तर मेहकरात प्रकाश गवई व सारंग माळेकर हे करणार आहेत. त्याद्वारे १३३३ बूथवर अभियान राबवले जाणार असून, जनतेत मोदी सरकार व राज्यातील महायुती सरकारची कामे पोहोचवली जाणार आहेत. भाजपने महाराष्ट्रासह देशभर विकासकामे केली असून, सर्वसामान्य जनता मोदी सरकारवर खूश आहेत. तसेच, लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी चुकीचा प्रकार केला होता, तोदेखील जनतेनेच हाणून पाडला आहे. विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ, असे मांटे यांनी सांगून, बुलढाणा विधानसभा मतदारसंघ आम्ही पक्ष पातळीवर भाजपकडे मागितला असून, तशी मागणी आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे, असेही मांटे यांनी सांगितले. याप्रसंगी उपस्थित विजयराज शिंदे यांनीही विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे सांगून, जागा वाटपानंतर बंडखोरी करायची की नाही, हे ठरवू, अशा शब्दांत पक्षाला सूचक इशारा दिला आहे.
विजयराज शिंदे हे भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य असून, लोकसभा निवडणूक प्रमुख आहेत. तसेच, ते तीनवेळा बुलढाणा मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवारीवर आमदार राहिलेले आहेत. शिंदे गटाचे विद्यमान आमदार संजय गायकवाड व शिंदे यांच्यातील राजकीय वैर तर सर्वश्रुत आहेत. त्यामुळे भाजपने बुलढाणा मतदारसंघ पक्षाकडे मागितला असल्याने या मुद्द्यावरून महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. शिंदे गट कोणत्याही परिस्थितीत बुलढाण्याची जागा सोडण्याच्या तयारीत नसल्याने भाजप हा मतदारसंघ स्वतःकडे घेण्यात यशस्वी होतो की नाही, हेदेखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
———