मेहकरात परिवर्तनाची नांदी; सिद्धार्थ खरातांच्या पाठीशी एकवटले कट्टर शिवसैनिक!
- मेहकरातील 'रेकॉर्ड ब्रेक मोर्चा'ने वातावरण पालटले!
– मेहकरची जागा विक्रमी मतांनी जिंकण्याचा कट्टर शिवसैनिकांचा निर्धार!
मेहकर (तालुका प्रतिनिधी) – मेहकर – लोणार विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानणारा मतदारसंघ असून, या मतदारसंघातील कट्टर शिवसैनिक हे शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आहेत. त्यामुळेच ३ ऑक्टोबररोजी मेहकरात निघालेल्या महायुतीच्या मोर्चाला ‘रेकॉर्ड ब्रेक’ प्रतिसाद तर मिळालाच; पण मेहकर मतदारसंघातील वातावरण पूर्णपणे पालटले आहे. शेतकर्यांच्या प्रश्नांवर आणि मेहकर मतदारसंघातील विकासाच्या मुद्द्यांवर हा मोर्चा काढण्यात आला होता. कट्टर शिवसैनिकांसह शेतकर्यांची मोठ्या संख्येने या मोर्चाला उपस्थिती होती. या मोर्चामुळे ‘प्रताप’गडाला चांगलाच हादरला बसला असून, या मतदारसंघात प्रा. आशीष रहाटे, किशोर गारोळे, गोपाल बछिरे यांच्यासारख्या स्थानिक नेतृत्वाच्या खंबीर भूमिकेमुळेच शिंदे गटाला लोकसभा निवडणुकीत मोठा लीड घेता आली नव्हता. आता विधानसभेलादेखील लोकसभेचीच पुनर्रावृत्ती होणार असून, शिवसेना (ठाकरे) पक्षाचे संभाव्य उमेदवार सिद्धार्थ खरात, किंवा उद्धव ठाकरे हे देतील तो उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने विधानसभेत पोहोचतील, अशा सूर या मतदारसंघातून आतापासून उमटू लागला आहे.
मेहकर-लोणार विधानसभा मतदारसंघ हा महायुतीत शिंदे गटाकडे तर महाआघाडीत शिवसेना (ठाकरे) पक्षाला सुटणार आहे. महाआघाडीकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे सिद्धार्थ खरात हे येथून उमेदवार राहणे जवळपास निश्चित आहे. शेतकरी, शेतमजूर व विकासाच्या मुद्द्यावर तीन ऑक्टोबरला शिवसेना (ठाकरे) जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वात विक्रमी असा मोर्चा काढण्यात आला होता. माजी सनदी अधिकारी असलेल्या सिद्धार्थ खरात यांच्यासारख्या या मतदारसंघातील नवख्या राजकारणी नेत्याच्या मोर्चाला इतकी गर्दी जमणे, ही तशी मतदारसंघातील राजकीय बदलाची चाहूल मानली जात आहे. या मतदारसंघातील निष्ठावंत व कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेले उपजिल्हाप्रमुख प्रा. आशीष रहाटे, शहरप्रमुख किशोर गारोळे, जिल्हा संघटक गोपाल बछिरे यांच्यासह इतर कट्टर शिवसेना नेत्यांनी हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले होते. मोर्चाला कट्टर शिवसैनिकांनी हजेरी तर लावलीच, पण मोठ्या संख्येने शेतकरी, कष्टकरी व शेतमजुरांची उपस्थिती होती. तसेच, शिवसेना महिला आघाडी, युवा सेना यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनीदेखील मोठे शक्तिप्रदर्शन करत, हा मोर्चा यशस्वी केला होता. यापूर्वी झालेल्या मोर्चाइतकाच हा मोर्चादेखील दणकेबाज झाल्याने जिल्ह्यातील शिवसेना (ठाकरे) पक्षाची ताकद अधोरेखीत झाली आहे. विशेष म्हणजे, या मतदारसंघातील विजय हा पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी प्रतिष्ठेचा राहणार असल्याने सर्व कट्टर शिवसैनिक व पदाधिकारी, कार्यकर्ते या मतदारसंघात एकजुटीने कामाला लागले आहेत.
मेहकर हा ठाकरेंचा बालेकिल्ला; उद्धव ठाकरे व शरद पवार ‘गेम’ फिरवणार!
मेहकर-लोणार हा शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघात शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः लक्ष घातले आहे. या मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा झाली नसली तरी, सिद्धार्थ खरात हे संभाव्य उमेदवार आहेत. या मतदारसंघातून ‘गद्दार’ कोणत्याही परिस्थितीत पडला पाहिजेत, असे ठाकरे यांनी आपल्या कट्टर शिवसैनिकांना आदेश दिलेले आहेत. या शिवाय, राज्यात महाआघाडीचे सरकार येण्याचे संकेत असून, त्यादृष्टीने महाआघाडीचे शिल्पकार ज्येष्ठ नेते शरद पवार हे स्वतः प्रत्येक मतदारसंघात लक्ष घालत आहेत. मेहकर मतदारसंघातदेखील स्वतः उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले हे लक्ष घालणार असून, ही जागा जिंकण्यासाठी मतभेद वैगरे विसरून कामाला लागणार असल्याचे महाआघाडीच्या वरिष्ठस्तरीय सूत्राने सांगितले आहे.