पीकविमा जमा होण्यास सुरूवात; राजकीय नेत्यांत श्रेयवाद पेटला?
- कृषीमंत्र्यांच्या बैठकीतील निर्णयाची अमलबजावणी; ना. प्रतापराव जाधव यांनी मानले राज्य सरकारचे आभार!
– रविकांत तुपकर म्हणतात, मुक्काम आंदोलनाच्या दणक्याने पीकविमा जमा होण्यास सुरूवात!
– कृषीमंत्री धनंजय मुंडे म्हणतात, शेतकर्यांचा हक्काचा पीकविमा मिळवून देण्यात सरकारला यश!
बुलढाणा (खास प्रतिनिधी) – खरिप व रब्बी हंगामातील पीकविम्याचे पैसे शेतकर्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरूवात झाली असून, बुलढाणा जिल्ह्यातील ४७ हजार ७०७ पात्र शेतकर्यांच्या खात्यावर ११२ कोटी २९ लाख रुपये जमा होणार आहेत. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबतच्या बैठकीतील निर्णयाची राज्य सरकारने अमलबजावणी केल्याबद्दल आभार व्यक्त करत, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी राज्य सरकारचे आभार व्यक्त केले, तर या पीकविम्याचे श्रेय महायुती सरकारला दिले आहे. दुसरीकडे, आपल्या मुक्काम आंदोलनाच्या दणक्यामुळेच हा पीकविमा जमा होत असल्याचे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी स्पष्ट केले आहे. आणि, विशेष म्हणजे, शेतकर्यांच्या हक्काचा पीकविमा मिळवून देण्यात सरकारला यश आले आहे, असे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले आहे. या सगळ्यांवर कडी म्हणजे, श्रेय कुणीही घ्या, आम्हाला पीकविमा मिळाल्याचे समाधान आहे, अशा प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत.
खरिप आणि रब्बी हंगामातील नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या खात्यामध्ये पीकविम्याचे पैसे जमा होण्याला सुरुवात झाली आहे. केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव, राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे, चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील व पीकविमा कंपनी यांच्यात झालेल्या बैठकीतील निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील २ लाख ७८ हजार ५४७ शेतकर्यांना प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा लाभ होणार असल्याचे महायुतीच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे. बुलढाणा जिल्ह्यात २०२२-२३ आणि २०२३-२४ या वर्षी खरिप आणि रब्बी हंगामामध्ये अतिवृष्टी होवून शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत पैसे मिळण्याच्या दृष्टिकोनातून गेल्या महिन्यात राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीं आणि पीकविमा कंपनीचे प्रतिनिधी यांच्या बैठक झाली होती. या बैठकीमध्ये केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव हेदेखील सहभागी झाले होते. शेतकर्यांच्या नुकसान भरपाईचे प्रकरणे त्वरित निकाली काढून शेतकर्यांच्या खात्यात पीकविमा कंपनीचे पैसे जमा करण्यात यावे, यासंदर्भात पीकविमा कंपनीच्या अधिकार्यांना निर्देशित करण्यात आले होते. त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यातील शेतकर्यांच्या खात्यात या नुकसान भरपाईचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. यामध्ये सन २०२३-२४ खरीप हंगामांतर्गत २ लाख ४३ हजार १४६ शेतकर्यांना २३३.६५ कोटी रुपये, रब्बी हंगामात २५६१ शेतकर्यांना १.६ कोटी रुपये, सन २०२३-२०२४ खरीप हंगामाअंतर्गत २ लाख २१ हजार ५५८ शेतकर्यांना १३८.८४ कोटी रुपये आणि रब्बी हंगामांतर्गत ५६ हजार ९८९ शेतकर्यांना १२५.२३ कोटी रुपये असे बुलढाणा जिल्ह्यातील २ लाख ७८ हजार ५४७ शेतकर्यांच्या खात्यामध्ये २६४.०७ कोटी जमा होणार आहे. शेतकर्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्याची कारवाई सुरू झाली आहे. जिल्ह्यातील शेतकर्यांना पीकविमा मिळून देण्यासाठी महायुतीच्या लोकप्रतिनिधीनी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासमवेत बैठक घेवून प्रलंबित नुकसान भरपाईचे दावे मंजूर करून घेतले त्यामुळे शेतकर्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे, असे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी स्पष्ट केलेले आहे.
तर दुसरीकडे, या पीकविमा जमा होण्याचे श्रेय घेण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचीही यंत्रणा पुढे आली आहे. पीकविम्याच्या प्रश्नावर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी २६ सप्टेंबररोजी दुपारी १ वाजेपासून बुलढाणा जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात ‘मुक्काम आंदोलन’ सुरू केले होते. अंथरून पांघरून आणि बॅग घेऊनच ते जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात पोहोचले होते. जोपर्यंत शेतकर्यांच्या खात्यात पीकविम्याची रक्कम जमा होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका रविकांत तुपकर यांनी घेतली होती. तुपकरांच्या आक्रमक भूमिकेमुळे पीकविमा कंपनीने बुलढाणा जिल्हातील १ लाख २६ हजार २६९ अपात्र शेतकर्यांचा पीकविमा मंजूर करत असल्याचे लेखी पत्र रविकांत तुपकरांना दिले. सरकारकडून पैसे प्राप्त होताच या शेतकर्यांच्या खात्यावर २३२ कोटी ४८ लाख रूपये जमा होणार आहे, या प्रक्रियेला वेळ लागणार आहे. परंतु पात्र शेतकर्यांना गेल्या ९ महिन्यांपासून हक्काचा पीकविमा का दिला नाही..? आजच्या आज शेतकर्यांच्या खात्यावर पीकविमा जमा करा व शेतकर्यांची फसवणूक करणार्या कंपनीवर कारवाई करा, यासाठी तुपकरांनी आक्रमक पवित्रा घेतला. अखेर रात्री सव्वा आठ वाजता प्रचंड पोलीस बंदोबस्तात तुपकरांना अटक केली, यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर जमलेल्या शेतकर्यांनी तसेच तुपकर यांच्या समर्थकांनी प्रचंड घोषणाबाजी केली. सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है…!अशा घोषणा शेतकर्यांकडून देण्यात आल्या. त्यामुळे बुलढाण्यात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. जिल्हा कृषी अधीक्षक मनोज ढगे यांच्या तक्रारीवरून रविकांत तुपकरांवर भारतीय न्यायसंहिता कलम १३२ अंतर्गत शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा दाखल करण्यात आला व मध्यरात्री तुपकरांची तात्पुरत्या जामिनावर सुटका करण्यात आली. पण तुपकरांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे ए.आय.सी.कंपनीने बुलढाणा जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पात्र ४७ हजार ७०७ शेतकर्यांच्या खात्यावर ११२ कोटी २९ लाख रूपये पीकविमा जमा करण्यास सुरुवात केली आहे. जर कंपनीने बुधवार ०२ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण पात्र शेतकर्यांच्या खात्यावर सोमवारपर्यंत पैसे जमा केले नाही तर कंपनीचे कार्यालय जागेवर ठेवणार नाही, असा इशारा तुपकरांनी दिला आहे.
पीकविमा जमा होण्यास सुरूवात झाल्याने शेतकर्यांना थोडाफार दिलासा मिळाला असून, त्याचे श्रेय महायुतीच्या आमदारांनी, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी घ्यावे, की रविकांत तुपकर यांनी घ्यावे, त्याने काहीही फरक पडत नाही. आमच्या हक्काचा पीकविमा मात्र हे सरकार देत आहे, याबद्दल सर्वसामान्य शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
—————