साखरखेर्डा परिसरावर दुष्काळाचेच सावट; परतीच्या पावसानेही फिरवली पाठ!
- सप्टेंबर महिन्यात केवळ ७३:०३ मिलीमीटर पाऊस तर सिंदखेडराजा तालुक्यात ७३५:७ मिलीमीटर पावसाची नोंद
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – सुरूवातीपासून साखरखेर्डा मंडळाकडे पावसाने पाठ फिरविल्याचे चित्र असून, यंदाचे पाऊसमानाचे वर्ष दुष्काळाचे सावट घेऊन आले आहे. सप्टेंबर महिन्यात केवळ ७३:०३ मिलीमीटर पाऊस पडल्याने पिकांच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे. तर तालुक्यात एकूण ७३५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे पुढील रब्बी हंगाम व उन्हाळा असे दोन ऋतू तोकड्या जलसाठ्यांत काढण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर निर्माण झालेले आहे.
साखरखेर्डा मंडळात जून महिन्यात पावसाने चांगली दडी मारल्याने या भागातील शेतकर्यांना खरिपाची पेरणी उशिरा करावी लागली. केवळ रिमझिम पाऊस बरसत राहिल्याने सोयाबीन, कपाशी, मूग, उडीद, तूर ही पिके तग धरून आहेत. जुलै महिन्यातही पाहिजे तसा दमदार पाऊस पडला नाही. नदी, नाले, ओढे खळखळ वाहिली नाही. पर्यायाने तलावाची पातळी वाढली नाही. ऑगस्ट महिन्यात दमदार पाऊस पडेल, अशी अपेक्षा होती. परंतु, त्यावरही पाणी फेरले. सप्टेंबर महिन्यात पाऊस पडेल अशी अपेक्षा होती. परंतु, तब्बल २० दिवस बखाड पडल्याने सोयाबीन पिकावर परिणाम झाला. फुले आली तर धुईसारखा व्हायरस आला, फुले गळाली. काही ठिकाणी शेंगा आल्या पण पाऊस न झाल्याने दाणे भरले नाही. अशा विचित्र परिस्थितीत शेतकरी असून, काही शेतात सोयाबीनची झाडे वाढली, पण शेंगा आल्या नसल्याने एकरी एक क्विंटलही सोयाबीन होत नाही. पर्यायाने शेतकर्यांना सोंगणीऐवजी वखर घालण्याची पाळी आली आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील सिंदखेडराजा मंडळात सप्टेंबर अखेर ७१९:०४ मिलीमीटर, किनगावराजा मंडळात ५८९:०८ मिलीमीटर, मलकापूर पांग्रा मंडळात ६७८:०६, दुसरबीड मंडळात ४६८:०४, सोनुशी मंडळात ५५७:०९, शेंदुर्जन मंडळात ६२८:०५, तर साखरखेर्डा मंडळात ५६४:०१ मिलीमीटर पाऊस पडूनही तलावांतील पाणीसाठ्यात पाहिजे तशी वाढ झाली नाही. काही तलावात ५० टक्के साठा असून, भविष्यात भीषण पाणी टंचाईचे संकट ओढावल्या जाऊ शकते. तालुक्यातील पावसाची आकडेवारी समाधानकारक दिसत असली तरी प्रत्यक्षात पाऊस कमीच झाल्याने नदी, नाले, ओढे वाहताना दिसत नाहीत.
माझ्या २६ एकर शेतात फुलेसंगम हे सोयाबीन बियाणे पेरले होते. अचानक व्हायरस आल्याने संपूर्ण शेतातील सोयाबीनची फुले गळाली आणि केवळ झाडे शिल्लक राहिली. त्या शेतात मजूरही सोंगणीला येत नाही.
– रामदाससिंग राजपूत, शेतकरी, साखरखेर्डा
—–