बुलढाण्यात उद्धव ठाकरे, शरद पवारांसमोर काँग्रेसने नांग्या टाकल्या?
- बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हातातून गेला; मेहकर, बुलढाणा, जळगाव जामोद विधानसभाही 'आंदण' देणार?
– आघाडीच्या राजकारणात काँग्रेस पिछाडीवर!
– काँग्रेसने हक्काच्या जागा सोडल्यात जमा, तर महायुती मात्र आपापल्या जागी ठाम?
बुलढाणा (बाळू वानखेडे) – सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. ‘सीट शेअरिंग’ हा मुद्दा सर्वच प्रमुख पक्षात ‘कळीचा’ बनल्याचे दिसून येत आहे. यामध्ये विशेषतः तडजोडीच्या नावाखाली सत्तेच्या मोहापायी काही पक्षांना आपल्या हातून हक्काच्या जागा गमावल्या लागणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे. बुलढाणा जिल्ह्याचा विचार करता, येथे आघाडीच्या राजकारणात काँग्रेस मात्र पिछाडीवर येते की काय? अशी शंका आता काँग्रेस कार्यकर्त्यांना सतावू लागली आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसने आघाडीच्या राजकारणात यापूर्वीच हातातून गमावला असून, आता मेहकर, बुलढाणा हे हक्काचे विधानसभा मतदारसंघ शिवसेना (ठाकरे) पक्षाला तर जळगाव जामोद शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आंदण दिल्या जातात की काय? याविषयीची कार्यकर्ते चर्चा करत आहेत. ही शक्यता खरी ठरल्यास काँग्रेसने उद्धव ठाकरे व शरद पवार या मातब्बर नेत्यांसमोर अक्षरशः ‘नांग्या’ टाकल्या असे बोलल्यास नवल वाटणार नाही. दुसरीकडे, महायुती मात्र जिल्ह्यात आपापल्या जागी ठाम असल्याचे दिसून येत आहे.
येत्या शनिवारी किंवा पुढील आठवड्यात राज्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील विधानसभा निवडणूक काही दिवसांवर आली आहे. त्यादृष्टीने सर्वच पक्ष जागावाटपात गुंतले आहेत. राज्याच्या राजकारणाचा विचार करता, येथे महायुती व महाविकास आघाडी यांच्यात विधानसभेच्या काही जागांच्या हेराफेरीवरून शीतयुद्ध सुरू असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे. असे असताना महायुतीला धूळ चारायचीच असा चंग महाविकास आघाडीने बांधला असल्याचे नेत्यांच्या बोलण्यातून दिसते. यामध्ये तडजोडीच्या नावाखाली, सत्तेच्या सारिपाटात काही पक्षांना आपल्या हक्काच्या जागा गमवाव्या लागणार असून, याचे दूरगामी परिणाम मात्र काही दिवसांनी समोर आल्यास नवल वाटण्याचे कारण नाही. जिल्ह्याचा विचार करता बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा गड राहिला आहे, पण कालांतराने हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला नंतर गेल्या निवडणुकीत शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या वाटेला गेला. हा घाव असह्य असताना आता यापूर्वी काँग्रेसकडे असलेले मेहकर (अजा), बुलढाणा हे शिवसेना (ठाकरे) तर जळगाव जामोद विधानसभा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाल्याची माहिती हाती आली आहे. यामध्ये मेहकर येथून सिद्धार्थ खरात, सिंदखेडराजातून दिलीप वाघ, बुलढाण्यातून जालिंदर बुधवत तर जळगाव जामोद मधून प्रसन्नजीत पाटील यांच्या उमेदवारीच्या घोषणेची केवळ औपचारिकता बाकी असल्याची विश्वासनीय माहिती राजकीय गोटातून मिळाली आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत मेहकरमधून अनंतराव वानखडे, बुलढाण्यातून हर्षवर्धन सपकाळ तर जळगाव जामोद विधानसभेतून स्वाती वाकेकर यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. विशेष म्हणजे, स्वतः लढणार असलेल्या बुलढाणा, सिंदखेडराजा येथे ठाकरे यांच्या शिवसेनेने मोर्चे काढले असून, दि. ३ ऑक्टोबररोजी मंत्रालयीन प्रशासकीय अधिकारी राहिलेले सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वात मेहकरातदेखील मोर्चा आयोजित केला असून, ते मतदारसंघ पिंजून काढत आहेत. जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ घेऊन बदल्यात शरद पवार गटाने सिंदखेडराजा शिवसेना (ठाकरे) पक्षाला दिल्याची विश्वासनीय माहिती आहे. पण, येथून मग काँग्रेसचे काय? असाही सवाल उपस्थित केला जात आहे. तर काही दिवसांअगोदर शरद पवार गटाचे नेते महेबूब शेख यांनी जळगाव जामोद येथे एका कार्यक्रमात प्रसन्नजीत पाटील यांना कामाला लागण्याच्या सूचनादेखील दिल्या होत्या, अशी विश्वासनीय माहिती आहे. एकंदरीत तडजोडीच्या नावाखाली सत्ता मिळवण्याच्या हेतूने सुरू असलेल्या या आघाडीच्या राजकारणात जिल्ह्यात काँग्रेस मात्र पिछाडीवर जाते की काय? अशी शंका आता सहाजिकच निष्ठावान कार्यकर्त्यांना सतावू लागली आहे. त्यामुळे आपण फक्त मतच द्यायचे काय? असाही सवाल कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. वास्तविक मेहकर, बुलढाणा हे काँग्रेसचे बालेकिल्ले राहिले असून, मेहकर मतदारसंघात काँग्रेसकडेच ठेवावा, म्हणून मतदारसंघातील जवळजवळ शंभर प्रमुख पदाधिकार्यांनी प्रदेश काँग्रेससह वरिष्ठांना त्याबाबतचे निवेदनदेखील दिले असल्याची माहिती आहे. काँग्रेसकडून येथून लक्ष्मणराव घुमरे, अनंतराव वानखेडे, माजी जि.प. अध्यक्ष अलका चित्रांगण खंडारे व साहेबराव पाटोळे हे इच्छुक आहेत तर बुलढाण्यातून संजय राठोड, जयश्री शेळके, हर्षवर्धन सपकाळ, गणेश पाटील, संतोष आंबेकरसह इतर इच्छुक आहेत. असे झाल्यास जिल्ह्यात काँग्रेसच्या हाती केवळ चिखली, खामगाव व मलकापूर हे तीनच मतदारसंघ राहणार आहेत. पर्यायाने जिल्ह्यातील काँग्रेसची ताकद कमी होणार असून, याचे दूरगामी परिणाम कालांतराने दिसून आल्यास नवल वाटू नये.
दुसरीकडे, महायुती मात्र आपापल्या जागी ठाम असून, मेहकर व बुलढाणा शिंदे गटाकडे, खामगाव, जळगाव जामोद, मलकापूर व चिखली भाजपकडे तर सिंदखेडराजा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे राहणार आहे. येथील उमेदवारही जवळपास निश्चित आहेत. विशेष म्हणजे, यातील मेहकरातून डॉ. संजय रायमुलकर, बुलढाणा संजय गायकवाड, चिखली श्वेताताई महाले, खामगाव आकाश फुंडकर, जळगाव जामोद संजय कुटे तर सिंदखेडराजा विधानसभेतून डॉ. राजेंद्र शिंगणे हे विद्यमान आमदार असून, मलकापूर चैनसुख संचेती व शिवचंद्र तायडे हे इच्छुक असले तरी येथून चैनसुख संचेती यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे.