देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) – अखिल भारतीय ३४ वी सब ज्युनियर मुला-मुलींची राष्ट्रीय खो-खो स्पर्धा झारखंड राज्यातील अल्बर्ट आक्का स्टेडियम सिमदेगा येथे दि.२८ सप्टेंबर २०२४ रोजी संपन्न होत आहेत. या स्पर्धेसाठी देऊळगाव घुबे येथील जानकीदेवी विद्यालयाच्या कु. ऋतुजा अनता घुबे व आरती बद्रीनाथ घुबे या दोन खेळाडू विद्यार्थ्यांनींची निवड झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे, विदर्भ राज्याचा मुलींचा खो-खो संघ निवडण्यासाठी दि.२१ व २२ सप्टेंबररोजी अमरावती येथे निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन राज्य फेडरेशनच्यावतीने करण्यात आले होते. या निवड चाचणी स्पर्धेसाठी जानकीदेवी विद्यालयाच्या अनुक्रमे ऋतुजा अनंता घुबे, आरती बद्रीनाथ घुबे, खुशी विजय घुबे, श्रावणी रामदास चवरे, आरती अनंता घुबे या पांच विद्यार्थिनींचा समावेश होता.
अमरावती येथील केशरबाई लाहोटी महाविद्यालयात संपन्न झालेल्या निवड चांचणी स्पर्धेमधे बुलढाणा जिल्ह्याच्या चमूने आपल्या उत्कृष्ट क्रीडा कौशल्याची चुणूक दाखविल्यावरुन कु. ऋतुजा घुबे व आरती बद्रीनाथ घुबे या दोन खेळाडू विद्यार्थिनीची राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्याच्या संघात निवड झाली असून, राष्ट्रीय स्पर्धेत सदर विद्यार्थीनी विदर्भ राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या सर्व खेळाडूंना जानकीदेवी विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक तथा खो-खो व क्रीडा मार्गदर्शक संजय सावंत यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले आहे. भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शेणफडराव घुबे, सचिव उद्धव घुबे, बुलढाणा जिल्हा खो-खो असोसिएशनचे सचिव तथा छत्रपती पुरस्कार विजेते टी. ए. सोर, जिल्हा क्रीडा अधिकारी महानकर, सहायक क्रीडा अधिकारी धारपवार व जानकीदेवी विद्यालयाचे प्राचार्य हरिदास घुबे यांनी या खेळाडूंचे अभिनंदन केले असून, राष्ट्रीय स्पर्धेत यश प्राप्त व्हावे म्हणून शुभेच्छा दिल्या आहेत. परिसरातून या विद्यार्थीनींचे कौतुक होत असून, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.