शेतकर्यांच्या रक्ताचा अपमान, गृहमंत्र्यांची माफी, पोलिसांवर कारवाईसाठी राहुल बोंद्रे यांचे अन्नत्याग आंदोलन
- आंदोलनाला शेतकर्यांचा वाढता पाठिंबा; जिल्हाभरात वणवा पेटणार!
– गृहमंत्र्यांनी शेतकर्यांची माफी मागून पोलीस प्रशासनावर कारवाई करावी : राहुल बोंद्रे
चिखली (महेंद्र हिवाळे) – चिखली विधानसभा मतदारसंघातील तीन हजार शेतकर्यांचे मागण्यांचे रक्ताचे निवेदन दि. १९ सप्टेंबरला बुलढाणा येथे मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी आलो असता, पोलिस प्रशासनाकडून माझी व सहकार्यांची अडवणूक करण्यात आली. जबरदस्तीने शेतकर्यांच्या रक्ताचे निवदेन हिसकावून जिल्हा पोलीस प्रशासनाने फाडले. हा शेतकर्यांच्या रक्ताचा घोर अपमान असल्याने गृहमंत्र्यांनी शेतकर्यांची माफी मागून पोलीस प्रशासनावर कडक कारवाई करावी, यासाठी आदर्श गाव सावरगाव डुकरे येथे सोमवार, दि. २३ सप्टेंबरपासून आम्ही शेतकर्यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. गृहमंत्री व पोलीस प्रशासनाने त्यांच्या केलेल्या शेतकरीविरोधी कृत्यासाठी माफी मागेपर्यंत हे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरूच राहील, असे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आ. राहुल बोंद्रे यांनी सांगितले.
सोयाबीनला ७ हजार रुपये भाव, थकलेला पीकविमा, शेतकर्यांना कर्जमाफी, सिंचन अनुदानाचा अनुशेष, शेतकर्यांना दिवसा सलग १२ तास वीज, वन्य प्राण्यांपासून संरक्षण या मागण्यांसाठी शेतकरी रक्ताच्या निवेदनाने असंतोष व्यक्त करत असतांना त्यांच्या मागण्यावर चर्चा तर नाहीच उलटपक्षी निवेदन फाडणे म्हणजे त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचे राहुल बोंद्रे म्हणाले. शेतकर्यांच्या प्रश्नावर सत्ताधारी व विरोधक यांनी एकजूट दाखवून त्यांच्या मागण्यांची पूर्तता करणे अपेक्षित असतांना फक्त मला वैयक्तिक विरोध म्हणून शेतकर्यांवर तुम्ही अन्याय करत आहात. सरकारला शेतकर्यांचा अपमानाचा हिशोब न मागता तुम्ही त्यांच्या मागण्यांना विरोध करतांना दिसत आहे. माझा वैयक्तिक विरोध त्यांना कुठेही करता येईल, तसा ते करत आलेलेही आहे. मात्र विरोधकांची शेतकर्यांना सहानुभूती नसणे हा दुर्देवी प्रकार असल्याचेही राहुल बोंद्रे म्हणाले. यावेळी सावरगाव डुकरे गावचे शेकडो शेतकरी उपस्थित होते.
—-
दिवसभरात आंदोलनाला १ हजार शेतकर्यांच्या भेटी
गोरगरिबांच्या सेवेत आयुष्य अर्पण केलेल्या सर्व महापुरुषांना वंदन करून, शेतकर्यांच्या रक्ताचा अपमान केल्याच्या व शेतकर्यांवर दडपशाही करणार्या सरकारच्या निषेधार्थ आदर्शगाव सावरगाव डुकरे येथे अन्नत्याग आंदोलनाला सोमवारपासून सुरुवात करण्यात आली आहे. या आंदोलनाला २३ सप्टेंबररोजी १ हजारांपेक्षा अधिक शेतकर्यांनी भेटी देवून आपला पाठिंबा दर्शविला आहे, तर आंदोलनस्थळी महाविकास आघाडीचे चिखली मतदारसंघातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकीकडे शेतकर्यांच्या रक्ताचा जाब विचारात राहुल बोंद्रे व शेतकरी हे अन्नत्याग उपोषण करत असताना दुसरीकडे त्यांच्याविरोधात राजकीय खेळी करत, सावरगाव डुकरे येथील काही कार्यकर्ते हे उपोषणाला बसल्याची चर्चा आहे. राहुल बोंद्रे यांनी जिल्हा सहकारी बँकेचे ९४ कोटी रूपये थकीत कर्ज त्वरित भरावे, अशी मागणी या कार्यकर्त्यांनी करत उपोषण सुरू केले आहे. पवन डुकरे, संतोष काळे, अमोल डुकरे यांचे हे उपोषण आंदोलन म्हणजे शेतकरीहिताच्या मागण्यांकडून दुर्लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा तालुक्यातील शेतकरीवर्गातून ऐकू येत आहे.
———–