तुम्हालाच स्वतःला माहिती नाही कोणत्या पक्षाकडून लढायचं, लोकं कशाला विचारतील?
- गायत्रीताई शिंगणे यांचा काका आमदार डॉ. राजेंद्र शिंगणेंवर पलटवार!
– तुम्हीपण डायरेक्ट आमदारकीच लढलात; पहिल्यांदा निवडणूक लढली तेव्हा कुठं झेडपी-पंचायत समितीचा अनुभव होता!
– तुम्ही गेल्या २५ वर्षांत केलेले एक विकासकाम दाखवा? लोकांना येड्यात काढणं सोडा आता!
सिंदखेडराजा (अनिल दराडे) – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते व सिंदखेडराजा-देऊळगावराजा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी परवा एका जाहीर कार्यक्रमातून विधानसभेसाठी इच्छूक असलेल्या तरूण नेत्यांचा समाचार घेताना, ज्यांना जिल्हा परिषद- पंचायत समिती माहिती नाही, ते आमदारकी लढायला चालले आहेत, मी उभा राहिलो की लोकं मला पक्ष विचारत नाहीत, अशी शाब्दिक टोलेबाजी करत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संभाव्य उमेदवार तथा त्यांच्या पुतणी गायत्री शिंगणे यांचा नामोल्लेख टाळून फटकारले होते. त्याला गायत्री शिंगणे यांनी आज जोरदार प्रत्युत्तर देत, तुम्ही जेव्हा डायरेक्ट आमदारकी लढवली तेव्हा तुम्हाला तरी कुठं जिल्हा परिषद पंचायत समितीचा अनुभव होता? तुम्हाला स्वतःलाच माहिती नाही की तुम्हाला कोणत्या पक्षाकडून लढायचे आहे? तेव्हा लोकं तरी कशाला विचारतील, अशा शब्दांत गायत्री शिंगणे यांनी काका तथा आमदार डॉ. शिंगणे यांच्यावर पलटवार केला आहे.
गायत्री शिंगणे या सिंदखेडराजा-देऊळगाव राजा मतदारसंघातून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य आमदार आहेत. स्वतः पवारांनी त्यांना कामाला लागण्याच्या सूचना केल्या आहेत. तर त्यांच्या उमेदवारीवर परवा एका जाहीर कार्यक्रमात डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी नामोल्लेख टाळून टीका केली होती. त्याला गायत्री शिंगणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या, की काल आमदार साहेब जसं म्हणाले मी उभा राहिलो की लोक पक्ष विचारत नाही; का विचारत नाही? तुम्हाला स्वतःला माहित नाही की तुम्हाला कोणत्या पक्षाकडून लढायचे? दुसरा मुद्दा असा ते म्हणाले, की भावी आमदारांच्या लाईन लागलेल्या आहेत. मतदारसंघात लोकशाही आहे, उभे राहायचा अधिकार सर्वांना आहे. तुम्ही जेव्हा आमदारकीला उभे राहिले, त्याच्या आधीसुद्धा तुम्ही जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका इतर कोणत्याच निवडणूक लढल्या नव्हत्या. तुम्हीसुद्धा डायरेक्ट आमदारकीला उभे होते. तेव्हा मला टोमणा मारताना तुम्ही हे विसरलात कसे? मला तरी असे वाटते यांना कोणी कोणत्या पक्षात घ्यायला तयार नाहीये, म्हणून हे लोकांना म्हणतात की जनता माझ्या पाठीशी आहे आणि मला कोणत्या पक्षाची गरज नाहीये. मग एक काम करा तुम्ही या वेळेस अपक्ष हा फॉर्म भरा, बघू तुम्हाला कोण किती साथ देतो? गेल्या २५ वर्षात व मागच्या या पाच वर्षात साहेबांनी पाच केलेले ठोस सार्वजनिक कामे सांगावीत, की ज्या कामामुळे मतदारसंघाचा विकास झाला. उगीच गप्पा मारू नयेत. त्यांच्या सोबत राहणार्या कार्यकर्त्यांवर आज हलाखीची परिस्थिती आहे. यांनी काय दिले कार्यकर्त्यांना? मतदारसंघाला काही देऊ शकले नाही ते कार्यकर्त्यांना काय देणार? असा सवालही गायत्री शिंगणे यांनी उपस्थित करून आ. शिंगणे यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागले.
घोडा मैदान समोर आहे, निवडणुकीच्या मैदानात उतरा लोकंच तुमचा निकाल लावतील. भास्कररावजी शिंगणे (आजोबा) यांनी सुरू केलेला कारखाना, सूतगिरणी हेसुद्धा साहेब सांभाळू शकले नाही, तर त्यांनी बाकीच्या गप्पा तर कमीच माराव्यात. माझ्यावर असो की इतर भावी आमदारांवर टीका करण्यापेक्षा साहेबांनी स्वतःकडे लक्ष दिले पाहिजे, हे माझे मत आहे. जनतेला येड्यात काढणे बंद करा, आणि मी तर ठोसपणे सांगू शकते की एवढ्या २५ वर्षात का एवढ्या पाच वर्षात साहेबांच्या काळात झालेली विकासकामे दाखवावीत? त्यांचे मलिदा खाणारे दोनचार कार्यकर्ते सोडले तर कुणीही खूश नाही. तुम्ही जर माझे नाही होऊ शकले तर तुम्ही जनतेचे कधी होणार?
– गायत्री शिंगणे, संभाव्य उमेदवार, महिला नेत्या (राष्ट्रवादी
आ. संजय गायकवाडांना माजी मंत्री आ. शिंगणेंनीही नामोल्लेख टाळून फटकारले!