Head linesSINDKHEDRAJAVidharbha

पैनगंगेत वाहून गेलेल्या रविंद्र नन्हईचा मृतदेह ब्रम्हपुरीजवळ सापडला, साखरखेर्डा येथे हळहळ!

- ओलांडेश्वराच्या दर्शनाला गेले, पाय घसरून पडल्याने वाहून गेले; शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

साखरखेर्डा (अशोक इंगळे) – येथील माळीपेठमधील रहिवासी रविंद्र नामदेव नन्हई यांचा मृतदेह पैनगंगा नदीच्या पात्रात सापडला असून, साखरखेर्डा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. काल ते ओलांडेश्वर (दुधा) येथे दर्शनासाठी गेले होते. पाय घसरून पैनगंगा नदीत पडल्याने त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला होता.

सविस्तर असे, की साखरखेर्डा येथील बाबुराव नन्हई यांना दोन मुले, दोन मुली असून, दोन्ही मुले शिर्डी येथील साईबाबा संस्थानमधील रुग्णालयात आरोग्य विभागात आरोग्य सेवक म्हणून कार्यरत आहेत. साखरखेर्डा येथील किंवा परिसरातील कोणताही रुग्ण तपासणीसाठी गेला असता, त्याची संपूर्ण व्यवस्था हे दोघे भावंडं करीत. ऑपरेशनपासून ते औषध उपचार आपल्या भागातील नागरिकांना कसा तत्पर उपलब्ध होईल, यासाठी सहकार्य करीत. गौरी पुजन सणाला दोघे भाऊ, पत्नी, मुले, बहिण असा परिवार साखरखेर्डा येथे आला होता. शुक्रवारी ओलांडेश्वरच्या दर्शनासाठी गेले होते. दुपारी आंघोळ करून दर्शनासाठी निघालेल्या रविंद्र नन्हईचा पाय घसरल्याने तो नदीच्या पात्रात पडला.

पेनटाकळी धरणाचे सात वक्र दरवाजे उघडण्यात आलेले असल्याने प्रचंड प्रमाणात पाण्याचा प्रवाह नदीपात्रातून वाहात होता. त्या पाण्यात रविंद्र हा वाहून गेला. ही बातमी साखरखेर्डा आणि परिसरातील गावांना समजताच अनेक युवक दुधा ब्रम्हमपुरी येथील ओलांडेश्वर येथे गेले. काल, १३ सप्टेंबररोजी दुपारी दोन वाजेपासून शोध घेतला असता तो कोठेही आढळून आला नाही. आज १४ सप्टेंबर रोजी सकाळी बचाव पोलीस पथकाने शोध मोहीम हाती घेतली असता, ब्रम्हपुरीजवळ पैनगंगा नदीपात्रात १०:४० वाजता रविंद्रचा मृतदेह आढळून आला. रविंद्र बाबुराव नन्हई यांच्या अपघाती मृत्यूनंतर साखरखेर्डा येथील भोगावती नदी काठावरील हिंदू स्मशानभूमीत दुपारी दोन वाजता अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी साखरखेर्डावासीयांच्या डोळ्यात पाणी दाटले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!