भाजपचे विदर्भावर विशेष लक्ष; बुलढाण्यातील तीनही जागा पुन्हा जिंकणार!
- बुलढाणा, चिखली, खामगाव, जळगाव जामोद या जागांवर महायुतीचा विजय निश्चित : सूत्र
– भूपेंद्र यादव महाराष्ट्रात तळ ठोकणार; रावसाहेब दानवेंकडे विधानसभा निवडणुकीची सूत्रे
मुंबई/बुलढाणा (खास प्रतिनिधी) – लोकसभेतील पराभवातून सावध झालेल्या भारतीय जनता पक्षाने विदर्भातील आपल्या जागांवर विशेष लक्ष केंद्रीत केले असून, महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्ता आणण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे स्वतः लक्ष घालून आहेत. त्यामुळेच शाहांच्या जवळचे असलेल्या केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी सोपविण्यात आली असून, माजी मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर निवडणूक व्यवस्थापन समितीची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. बुलढाण्यातील खामगाव, जळगाव जामोद, चिखली या मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार असून, या तीनही जागा भाजप मोठ्या मताधिक्क्याने जिंकणार असल्याचे खासगी सर्वेक्षण पुढे आल्याने भाजपचा आत्मविश्वास दुणावला आहे. सिंदखेडराजा व मेहकरची जागा मात्र महायुतीसाठी अडचणीचा मुद्दा ठरणार असल्याने येथे महायुती उमेदवार बदलून देते?; की आहे त्याच आमदारांना पुन्हा उमेदवारी मिळते, हे पाहणेही औत्सुक्याचा मुद्दा आहे.
भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीवर पूर्णपणे लक्ष केंद्रीत केले असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे स्वतः महाराष्ट्रावर लक्ष ठेवून आहेत. महाराष्ट्राचे वातावरण महायुतीला अनुकूल नसल्याचे काही सर्वेक्षण पुढे आल्यानंतर केंद्रीय मंत्री तथा महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादव यांनी महाराष्ट्रात आपला मुक्काम वाढविला आहे. तसेच, विधानसभा निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची नियुक्तीदेखील करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपचा राज्यात आणि विशेषत: मराठवाड्यात दारुण पराभव झाला. या पार्श्वभूमीवर मराठवाडा आणि मराठा असे समीकरण भाजपने साधले असल्याचे दिसून येते. यापूर्वी भाजपने लोकसभा निवडणुकीत आमदार श्रीकांत भारतीय यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक व्यवस्थापन समिती स्थापन केली होती. या समितीचा रिझल्ट अतिशय खराब आला आहे. त्यामुळे या समितीचे प्रमुखपद दानवे यांना देण्यात आले आहे. मराठवाड्यात भाजप पक्ष संघटना कमजोर झाली असून, मराठा आरक्षणाच्या प्रश्नाचाही फटका बसला आहे. स्वत: दानवे हे जालना मतदारसंघातून पराभूत झाले होते. मराठवाड्यात पक्षाला बळ मिळावे, या उद्देशाने दानवे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत असले तरी, दानवे यांचा मराठवाडा व विदर्भात चांगला वावर असून, त्यांना राजकीय खाचखळगे चांगलेच माहिती असल्याने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
निवडणुका लांबणीवर पडून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते, अशी राजकीय चर्चा असली तरी, भाजपच्या वरिष्ठस्तरीय सूत्रांच्या माहितीनुसार, ठरलेल्या वेळी म्हणजेच नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे भाजपकडून विधानसभेची जोरदार तयारी केली जात आहे. अमित शाह हे नुकतेच मुंबई दौर्यावर आले. त्यांनीदेखील निवडणुकीचा आढाव घेतला. मात्र, विधानसभेची खास जबाबदारी केंद्रीय मंत्री, भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव यांच्याच खांद्यावर असणार आहे. यादव हे महाराष्ट्रात तळ ठोकून बसणार असणार आहेत. तसेच प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी तसेच त्याचा अहवाल वरिष्ठांना देण्यासाठी बाहेरील राज्यातील भाजप नेते व कार्यकर्त्यांची फौज महाराष्ट्रात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील मतदारसंघातील आढावा गुजरातमधील भाजप नेते घेत आहेत. तर, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही मतदारसंघांचा आढावा छत्तीसगडमधील नेत्यांकडून घेण्यात येतो आहे. हे नेते आपला अहवाल वरिष्ठांना देणार आहेत. दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर व सिंदखेडराजा या दोन मतदारसंघातील महायुतीच्या जागा धोक्यात असल्याची खात्रीशीर माहिती एका सर्वेक्षण अहवालाच्या आधारे सूत्राने दिली आहे. तर खामगाव, जळगाव जामोद व चिखली या भाजपच्या जागा बिनधोक निघणार आहेत. तसेच, बुलढाण्याची शिंदे गटाची जागादेखील बिनधोक निघणार असल्याची या सूत्राची माहिती आहे. महायुतीतील विद्यमान आमदारांच्या या जागांवर महाआघाडीने कुणीही उमेदवार दिला तरी या जागांवर निश्चित विजय मिळेल, असा विश्वास महायुतीच्या या सूत्राने व्यक्त केला. दुसरीकडे, महाआघाडीत बुलढाणा व मेहकरची जागा ही शिवसेना (ठाकरे) पक्षाकडे आहे. या दोन्हीही जागा काँग्रेसने मागितल्या आहेत. तथापि, उद्धव ठाकरे या जागा काँग्रेसला सोडण्यास तयार असून, या दोन्हीही जागांवरील उमेदवारदेखील उद्धव ठाकरे यांच्या पातळीवर निश्चित झाले असून, ते उमेदवार कामालादेखील लागलेले आहेत.
अजित पवार बारामतीमधून लढणार, डॉ. शिंगणे हेच सिंदखेडराजातून उमेदवार!
अजित पवार गटाची पक्षांतर्गत बैठक नुकतीच पार पडली आहे. या बैठकीला अजित पवार गटाचे जेष्ठ व दिग्गज नेते उपस्थित होते. या बैठकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या संभाव्य २० उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या यादीनुसार बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट होत आहे. तर बीड परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे हे रिंगणात उतरणार असून, सिंदखेडराजा मतदारसंघातून डॉ. राजेंद्र शिंगणे हेच उमेदवार राहणार आहेत.