कर्जत पाेलिसांकडून चाेख बंदाेबस्त तैनात
कर्जत (आशिष बाेरा) : कर्जतचे ग्रामदैवत संत श्री सदगुरू गोदड महाराजांचा रथयात्रा उत्सव कामिका एकादशीला म्हणजेच येत्या रविवारी २४ आणि २५ जुलै रोजी होत असून, शहरात भाविकांच्या स्वागताची तयारी जोरदार सुरू आहे. रथोत्सव निम्मिताने ईदगाह मैदान व दादा पाटील महाविद्यालयासमोर मनोरंजन नगरीची उभारणी करण्यात आली आहे.
श्री गोदड महाराज यांच्या संजीवन समाधीमुळे कर्जतला धाकटी पंढरी असे संबोधित केले जाते. सालाबाद प्रमाणे २४ आणि २५ जुलै रोजी येथील यात्रा भरणार असुन या रथयात्रेला राज्यभरातून लाखो भाविकांची उपस्थिती असते. कर्जतसह परिसराचे ग्रामदैवत असणाऱ्या संत श्री गोदड महाराजांच्या रथयात्रेची तयारी पूर्ण झाली आहे. य़ा दिवशी श्री पांडूरंग श्री गोदड महाराजाच्या भेटीला येतात अशी आख्याईकां आहे. विविध प्रकारचे फुलांनी सजवलेला तीन मजली लाकडी रथ दोरखंडाने भाविक भक्ती-भावाने ओढतात. रथाच्या पुढे तालुक्यातून आलेले भजनी मंडळ हातात पताका घेऊन टाळ मृदंगाच्या तालात भजने गात असतात. रथ यात्रा मार्गावर भाविक नारळाची तोरणे अर्पण केली जातात. यासह ठिकठिकाणी भाविकांना चहा, फराळाची मोफत व्यवस्था केली जाते. तसेच लहानांसह मोठ्यांचाही उत्सुकतेचा विषय असणारी येथील मनोरंजन नगरी लहान-मोठे पाळणे, रेल्वेगाडी, मौत का कुआ, जादूचे प्रयोग, लाईट डान्स यासारख्या खेळण्यांद्वारे लोकांचे मनोरंजन होते. तसेच महिलांसह इतर दैनदिन उपयोगाच्या वस्तूंच्या विक्री सह खाद्यपदार्थाचे खास दुकाने थाटली जात असून यातून कोट्यावधी उलाढाल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोमवार दि २५ रोजी कुस्तीचा हगामा रंगणार असून यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत मल्ल हजेरी लावणार असल्याची माहिती संत श्री गोदड महाराज यात्रा कमिटीच्यावतीने देण्यात आली आहे.
मनोरंजन नगरीत यावेळी सुरक्षे च्या दृष्टीने जागोजाग सीसीटीव्ही बसविण्यात आले असून कोणीही गैरप्रकार करताना आढळल्यास त्यावर त्वरित कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली आहे. कर्जत नगर पंचायतच्या वतीने रथ मार्गासह कर्जत शहरात विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
दोन वर्षांनंतर भरणारी यात्रा अधिक जोमाने
कोरोना मुळे गेली दोन वर्षे कर्जतची यात्रा भरली नव्हती त्यामुळे यावर्षी अधिक उत्साहात यात्रा भरणार असून यामाध्यमातून कोट्यावधी ची उलाढाल होणार असली तरी यावर्षी सर्वच भाव वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांचे मात्र कंबरडे मोडणार आहे.