नांदुरा (प्रतिनिधी) : शाळा सुटल्यानंतर घरी परतणार्या शिक्षिकेला काही युवकांनी भररस्त्यात अडवून तुम्ही विद्यार्थ्यांना औरंगाबादच्याऐवजी संभाजीनगर का शिकवत नाही, असे म्हणत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना २२ जुलैच्या भरदुपारी साडेचार वाजेदरम्यान बुलढाणा रोडवरील हेलगेनगर जवळ घडली. या घटनेने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
सविस्तर असे, की पुजा कैलास वाकोडे (वय २६) रा. रसुलपूर (कोळंबा) ता. नांदुरा या शिक्षिकेने नांदुरा पोलीस ठाण्यात दिलेल्या कैफियतमध्ये नमूद केले आहे की, मी नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यानंतर घरी परत जात असतांना हेलगेनगर नजीक आरोपी जितु मोरे, अक्षय डंबेलकर दोघेही रा. नांदुरा व इतर काही अनोळखी मुले यांनी मला भररस्त्यात अडवून तुम्ही विद्यार्थ्यांना औरंगाबादच्या ऐवजी छत्रपती संभाजीनगर का शिकवत नाही, तुम्हाला शिकवता येत नाही, तू शिक्षिका बनण्याच्या लायकीची नाही, तुम्ही नांदुर्यात कसे राहता आम्ही बघतो, असे म्हणत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी नांदुरा पोलीसांनी उपरोक्त आरोपी युवकांविरुद्ध भारतीय दंडसंहितेच्या कलम ३४१, २९४, ५०६ अन्वये गुन्हे नोंदवले असून, या प्रकरणाचा पुढील सखोल तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महादेव धंदरे हे करीत आहेत.
Leave a Reply