ChikhaliVidharbha

प्रलंबित पीकविमा, नुकसान भरपाई व भक्ती महामार्ग रद्द करण्यासाठीचे आंदोलन तिसर्‍या दिवशीही सुरूच!

– चिखली तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी यांची आंदोलनास भेट

चिखली (राधेश्याम काळे) – गेल्या वर्षीचा प्रलंबित पीकविमा, नुकसान भरपाई तसेच भक्ती महामार्ग रद्द करा, तालुक्यातील रखडलेले विहिरींच्या प्रस्तावांना मान्यता मिळावी, यासह शेतकरी व कामगारांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते विनायक सरनाईक व नितीन राजपूत यांनी चिखली तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाला तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांनी भेट दिली व आंदोलनकर्ते यांच्याशी चर्चा केली. परंतु जोपर्यंत शेतकर्‍यांच्या खात्यात रक्कम जमा होणार नाही, इतर मागण्यांच्या अनुषंघाने कारवाई होणार नाही, तोपर्यंत आंदोलन थांबणार नसल्याची भूमिका आंदोलनकर्ते यांनी घेतली. त्यामुळे हे आंदोलन आता तालुकाभर पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. दरम्यान, आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांसंदर्भात उद्या आमदार श्वेताताई पाटील यांच्या मध्यस्थीने राज्य सरकारची महत्वाची बैठक मुंबईत होत असल्याने आंदोलनकर्त्यांच्या मागण्या राज्य सरकारकडून मान्य होण्याची आशा निर्माण झाली आहे.

गेल्यावर्षी अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीने खरीप व रब्बी हंगामात शेतकर्‍यांच्या हातातोडाशी आलेला घास हिरावला गेला. शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. नवीन खरीप हंगाम आला तरीसुद्धा पीकविमा कंपनीकडून विमा देण्यास टाळाटाळ केली जात आहे. तारीख पे तारीख शेतकर्‍यांना दिली जात आहे. ज्यांना विमा दिला त्यांना अतिशय तुटपुंजी रक्कम दिली तर चिखली तालुक्यातील रब्बीतील ८७८६ तर खरीप मधील २६०१५ शेतकर्‍यांना विविध कारणे दाखवत अपात्र केले आहे. तर आजही विमा कंपनीकडे तालुक्यातील खरीपाच्या १४०६२ शेतकर्‍यांची एकूण ५ कोटी ७२ लाख तर रब्बीची १०७४३ शेतकर्‍यांची २३कोटी ५४लाख ऐवढी पीकविमा रक्कम बाकी आहे. दोन ते चार महिणे उलटुनसुद्धा विमा कंपनीकडुन शेतकर्‍यांच्या खात्यावर रक्कम दिली जात नाही. ऑनलाइन प्रणालीमुळे ई-केवायसी करूनसुद्धा हरभर्‍याची नुकसान भरपाई अडकून पडली आहे. अनेक शेतकर्‍यांच्या शेतात हरभरा असतांना यादीत नाव नसल्याने ते नुकसान भरपाई मिळणेपासून वंचित आहेत. तर दुसरीकडे भक्ती महामार्गाला शेतकर्‍यांचा तीव्र विरोध असतांना भक्ती महामार्ग करण्याचा घाट शासन घालत आहे.शेतक-यांचा विरोध असेल तर महामार्ग करणार नाही, असे मुख्यमंत्री सांगत आहेत. तरीसुद्धा शेतकर्‍यांना नोटीस दिल्या जात असल्याने महामार्ग रद्दबाबत अमलबजावणी करून आदेश पारीत करण्यात यावा, याबाबत शेतकर्‍यांनी नोंदवलेल्या हरकतीचा एकत्रीत प्रस्ताव शासनास सादर करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यासोबत चिखली तालुक्यात रोजगार हमी योजनेचे विहिरींमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. त्या भ्रष्टाचाराची जलगतीने चौकशी करून तातडीने रखडलेल्या विहीर, गोठे, घरकुलाचे प्रस्ताव मंजूर करण्यात यावे, तसेच चिखली शहरालगतची १६ गावे महावितरणे उंद्री (उदयनगर) विभागात समाविष्ट केल्याने नागरिकांची हेळसांड होत आहे, गावचे सरपंच व नागरिकांनी वारंवार मागणी करूनही महावितरण कार्यवाही करत नाही, त्यामुळे तातडीने ही १६ गावे पूर्वीप्रमाणे चिखली विभागात समाविष्ट करण्यात यावी. तर कामगार कल्याणच्या माध्यमातून राबविलेल्या जाणार्‍या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे, कामगारांची मोठी आर्थिक लूट होत आहे. इतर तालुक्यात संसार किट वाटप झालेल्या असतांना चिखली तालुक्यात मात्र कामगार कल्याणच्या व संबंधित संस्थेच्या वेळ काढू धोरणामुळे अनेक कामगारांची नूतनीकरण तारीख संपली आहे व नूतनीकरणासाठी वेळ लागत असल्याने हजारो कामगार योजनेपासून वंचित राहणार आहे. त्यामुळे तातडीने वंचित कामगारांना योजनेचे लाभ देण्यात यावा, भ्रष्ट व दोषी कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यात यावी, अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे.

दरम्यान, दुसर्‍या दिवशी आंदोलनाला तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, गट विकास अधिकारी व सहाय्यक निबंधक यांनी भेट दिली व मागण्यांच्या अनुषंगाने कारवाई करू, असे देखील सांगितले. परंतु यापुर्वी निवेदने देऊनसुद्धा कारवाई झाली नसल्याने ठोस उपाययोजना करा, शेतकर्‍यांच्या खात्यात पीकविमा जमा करा, भक्ती मार्ग रद्द करण्यासाठी शासनास बाध्य करावे व मागण्या पूर्ण कराव्यात, अशी भूमिका आंदोलनकर्ते यांनी घेतली आहे. या आंदोलनाला शेतकर्‍यांचा प्रचंड प्रतिसाद मिळतांना दिसत असून, गावागावातील शेतकरी आंदोलनात सहभाग नोंदवीत आहेत. दुसरीकडे, आंदोलनाच्या दुसर्‍यादिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांनी आंदोलनकर्ते यांना भेट दिली व महाराष्ट्र नवनिर्माण सेना ताकदीने सोबत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच, काल भक्ती मार्गातील बाधीत शेतकर्‍यांसह डॉ. सत्येंद्र भुसारी, डॉ.ज्योतीताई खेडेकर यांनीदेखील आंदोलनाला भेट दिली होती.


कामगार कल्याण विभाग व महावितरण झोपेतच!

निवेदन देऊन आठवडा उलटला तहसीलदार यांनी मागण्यांच्या अनुषंगाने पत्रव्यवहारसुद्धा केला. परंतु आंदोलनाला तिसरा दिवस उलटला तरी महावितरण व कामगार विभाग हे कामगार व ग्राहकांच्या प्रश्नी गंभीर नसल्याचे दिसून आले आहे.
———–

BREAKING NEWS! भक्ती महामार्ग रद्द करण्याच्या हालचाली गतिमान; आ. श्वेताताईंच्या विनंतीवरून उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्याच बोलावली उच्चस्तरीय बैठक!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!