‘हुमणी’ने केलेल्या सोयाबीन पीकनुकसानीची पाहणी करण्यासाठी आ. रायमुलकर थेट शेतबांधावर!
– ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या वृत्ताची घेतली गांभीर्याने दखल!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – जिल्ह्यात सततच्या पावसाने सोयाबीन पिकावर हुमणी अळीने आक्रमण केल्याने मोठे नुकसान झाले आहे. मेहकर तालुक्यातील देऊळगाव साखरशा शिवारात त्याचा मोठा उद्रेक पाहायला मिळत आहे. याबाबत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने ४ ऑगस्टरोजी बातमी प्रकाशित करताच प्रशासन खडबडून जागे झाले; तर आज (दि.७) आ.डॉ.संजय रायमुलकर यांनी येथील शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली व आवश्यक सूचना प्रशासनाला दिल्या. पूर्वसूचना देऊनही संबंधित तज्ञ अधिकारी घटनास्थळावर नसल्याचे दिसताच, आ. डॉ. रायमुलकर यांनी थेट पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाचे कुलगुरू डॉ.शरद गडाख यांना फोन करून याबाबत अवगत केले असता, दुपारी केव्हीके बुलढाणा व पीडीकेव्ही अकोला येथील तज्ज्ञ अधिकार्यांची टीम तडक नुकसानग्रस्त शेतात पोहोचत नुकसानीची पाहणी केली.
गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून जिल्ह्यात संततधार रिमझिम पाऊस पडत आहे. त्यामुळे पिकांवर विविध रोगांनी आक्रमण केले आहे. जिल्ह्यातील काही तालुक्यासह मेहकर तालुक्यातील देऊळगाव साखरशा शिवारात सोयाबीन पिकांवर हुमणी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. याबाबत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने दि. ४ सप्टेबररोजी सविस्तर व स्वयंस्पष्ट वृत्त प्रकाशित करताच, प्रशासनही जागे झाले. तसेच आ. डॉ. संजय रायमुलकर यांनी आज, दि. ७ ऑगस्टरोजी सकाळीच देऊळगाव साखरशा येथील भिकाजी पैठणकर यांच्या शेतातील नुकसानीची पाहणी केली व संबंधितांना आवश्यक निर्देश दिले. सदर नुकसानीबाबतची माहिती आपण आज बैठकीदरम्यान कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या कानावरदेखील घातली असल्याचे आ. डॉ. रायमुलकर यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले.
चिखली तालुक्यातही हुमणीमुळे सोयाबीनचे मोठे नुकसान झाल्याचे आज, ७ ऑगस्टरोजी सकाळी पाहणी दरम्यान आढळले, असे डॉ .अनिल तारूवरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले.
यावेळी उपविभागीय अधिकारी जोगी, उपविभागीय कृषी अधिकारी किशोर काळे, नायब तहसीलदार अजय पिंपरकर, पंचायत समितीचे कृषी अधिकारी मेटांगळे, मंडळ अधिकारी महाजन, कृषी पर्यवेक्षक विठ्ठल धांडे, कृषी सहाय्यक पी. एस. अंभोरे, ग्रामविकास अधिकारी रामप्रसाद शेळके, तलाठी तुळशीदास काटे, सरपंच संदीप अल्हाट, भिकाजी पैठणकर, रणजीत देशमुख, शिवसेना शाखाप्रमुख दिलीप नवत्रे, सुधाकर गायकवाड, विवेक पाचपवार, गौरव देशमुख, जीवन देशमुख, बबन चव्हाण, पिंटु पाटील, दीपक गायकवाडसह शेतकरी उपस्थित होते. मात्र याबाबतची पूर्वसूचना देऊनही संबंधिततज्ज्ञ गैरहजर दिसल्याने पंदेकृवि परिषद सदस्य असलेले आ. डॉ.संजय रायमुलकर यांनी थेट पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.शरद गडाख यांना फोन करून अवगत केले असता, कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा व पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची संबंधित तज्ज्ञ टीम दुपारी तडक नुकसानग्रस्त शेतात दाखल झाली. सदर टीममधील तज्ज्ञ अधिकार्यांनी प्रथम स्थानिक गणपती मंदिरात शेतकर्यांची मीटिंग घेऊन हुमणी अळीबाबत मार्गदर्शन करत उपाययोजना समजावून सांगितल्या. मेटारायझीयम अनासोपली या जैविकाची आळवणी करण्याचा सल्ला त्यांनी दिला. तसेच नुकसानीची माहिती वरिष्ठांना देणार असल्याचे सांगितले. संचालन व आभार प्रदर्शन ओम सोनोने यांनी केले.सदर तज्ज्ञ टीमने भिकाजी पैठणकर यांच्या शेतात जाऊन हुमणी अळीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. या टीममध्ये डॉ. धनराज उंदीरवाडे संचालक विस्तार शिक्षण, डॉ. पंदेकृवि अकोला, डॉ. पी. के. राठोड, कीटक शास्त्रज्ञ डॉ. पंदेकृवि अकोला, डॉ. अनिल तारू वरीष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा, प्रवीण देशपांडे कीटक शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा, मनेश यदुलवार, हवामान तज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा, उपविभागीय कृषी अधिकारी किशोर काळे, कृषी पर्यवेक्षक विठ्ठल धांडे, कृषी सहाय्यक पी. एस. अंभोरे आदींचा समावेश होता. यावेळी शेतकरी उपस्थित होते.
जिल्ह्यात पाऊस मुक्कामी; हुमणीने सोयाबीनला घेरले; पिके पिवळी, वाढही खुंटली!