आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयाच्या माध्यमातून आळंदी नगरपरिषद अग्निशमन दलात फायर बुलेट दाखल झाली असून यामुळे आळंदी शहर व परिसरातील अरुंद रस्त्यांच्या जागी देखील जलद गतीने पोहचून आगी वर नियंत्रण आणण्यात मोठी मदत होईल अशी माहिती आळंदी नगरपरिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.
अग्निशमन दलाचे अत्याधुनिकीकरण करणे, त्यामध्ये जलदता आणणे,कमी खर्चामध्ये,कमी मनुष्यबळामध्ये घटनास्थळापर्यंत तात्काळ पोहोचविण्यासाठी यंत्रणा निर्माण करणे हा उद्देश समोर ठेवून या फायर बुलेटची रचना करण्यात आली आहे.रॉयल एनफिल्ड ३५० सीसीची बुलेट मॉडीफाईड करण्यात आली असून यामध्ये दोन फोम सिलेंडर ज्याची क्षमता नऊ लिटरची आहे,बसविण्यात आले आहेत.
सदर फायर बुलेट चे प्रेशर ३१२ हॉर्स पॉवर इतके असून या गाडीबरोबर प्रथमोपचारासाठी आवश्यक असणारे किट देखील देण्यात आले आहे. आग लागल्यानंतर तात्काळ ती विझवली तर आगीची परिणामकारकता वाढत नाही. अग्निशमन दलाच्या गाड्यांचा वेग हा कमी असतो. गल्लीबोळात आणि अरुंद रस्त्यावर अग्निशमन दलाची गाडी काम करू शकत नाही. या सर्व बाबी विचारात घेऊन या फायर बुलेटची निर्मिती केली असून आग लागल्यानंतर प्रथम उपचार म्हणून तात्काळ ही गाडी आग लागलेल्या ठिकाणी दाखल होईल.आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ते प्रयत्न करतील.आग मोठी असेल तर अग्निशमन दलाची गाडी त्यांच्या पाठोपाठ घटनास्थळी दाखल होईल.अशा एकत्रित कामामुळे आगीमुळे होणारी जीवित आणि वित्तहानी टाळता येऊ शकेल.
आळंदी शहरात दाखल झालेल्या या फायर बुलेटचे लोकार्पण मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन विभाग प्रमुख सचिन गायकवाड व नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडले. आळंदी शहर व परिसरातील आगीच्या घटनांची माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळविण्यात सतत मोठी कामगिरी करणारे आळंदी नगरपरिषद अग्निशमन दल या फायर बुलेट उपलब्धतेने आणखीन सक्षम झाले आहे.